श्रीगोंदा,दि.०६:-लिंपणगाव ग्रामपंचायतीचा खंडित केलेला विद्युतपुरवठा पुन्हा सुरळीत करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणारा लिंपणगाव येथील वीज मंडळातील लाचखोर कनिष्ठ अभियंता पांडू पुनाजी मावळी वय ३६ याला आज अ.नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावत लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.लिंपणगाव ग्रामपंचायतीचे विद्युत बिल थकलेले असल्यामुळे वीज मंडळाने ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन तोडले होते. त्यामुळे गावचा पाणीपुरवठा बंद झाला होता. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे तक्रारदाराने कनिष्ठ अभियंता पांडू मावळी यांची भेट घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करून देण्याची विनंती केली होती.हा वीजपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी मावळी यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावर तक्रारदाराने नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.त्यानुसार आज लाचलूचपत विभागाच्या पथकाने सापळा लावत लिंपणगाव येथील हॉटेल श्रावणी येथे पंचासमक्ष १५हजारांची लाच स्वीकारताना या अभियंत्यास पकडले.सदरची कारवाई ही अ.नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि.पुष्पा निमसे, पो.हवा संतोष शिंदे,विजय गंगुल, रमेश चौधरी, पो.अंमलदार, रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक पो.हवा हरुन शेख,राहुल डोळसे याच्या पथकाने केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे