पुणे, दि.२९:- कामावरून काढून टाकल्याच्या रागातून मालकावर चाकूने वार केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी एकाला अटक केली.न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (ता. ३०) पोलिस कोठडी सुनावली आहे.उमेश किसन फसले (वय २३, रा. औंध) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सागर महादेव थिटे (वय ३०, रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास औंध येथे घडली.
आरोपी उमेश फसले अगोदर फिर्यादींकडे कामाला होता. घटनेच्या दिवशी फिर्यादी कामावरून घरी जात असताना आरोपीने त्यांना गाठले.
‘तू मला कामावरून का काढून टाकले,’अशी विचारणा करत आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि
पाठीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता,
गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.