पुणे, दि. २९:- अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्टात शिकायला आहेत त्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अफगाणी विद्यार्थ्यांना दिले. आठवड्याभरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सरहद संस्थेच्यातीने आयोजित महाराष्ट्रातील अफगाण विद्यार्थ्यासोबत येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टीट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी येथे संवाद साधला. यावेळी उच्च शिक्षण संचालक धनराज माने, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टीट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष मालोजीराजे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, किरण साळी, अफगाणी विद्यार्थी प्रतिनिधी महमद अफगाणी यांच्यासह अफगाणी विद्यार्थी उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री सामंत म्हणाले, अफगाणिस्तान देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अन्याय होणार नाही. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी लक्षात घेता सहानुभूतीपूर्वक विचार करुन आवश्यक ती मदत केली जाईल. व्हिसा बाबत केंद्र सरकारच्या परवानगी बाबत चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन मंत्री श्री. सामंत यांनी अफगाणी विद्यार्थ्यांना दिले.
महंमद अफगाणी यांनी पुढील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली. जेवण व निवासाची व्यवस्थेसाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती यावेळी केली.