सोलापूर,दि.०९:- विजापूर रोडवरील हत्तूर गावाजवळ बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कलवरी ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकून पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. यात मॅनेजर, कामगार, डान्सर आणि परप्रांतीय ग्राहकांचा समावेश आहे. या कारवाईत सुमारे 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बारमालक राहुल तानाजी लकडे हा फरार झाला आहे.मॅनेजर वैभव दत्तात्रय माळशिकरे (रा. वडकबाळ), कामगार अजय चंद्रकांत क्षीरसागर (रा. मिलिंदनगर, बुधवार पेठ), नर्तिका अत्रयी प्रिन्स भरमट (रा. इंदूर, मध्य प्रदेश), महेश रायप्पा अंदानी (रा. बेळगाव), मल्लिकार्जुन बसप्पा कुंभार (रा. जमखंडी, बागलकोट), प्रवीण बसवराज औरादी (रा. महालिंगपूर), गुरुराज काडप्पा हलकरनी (रा.बनहट्टी, बागलकोट), विलास विश्वनाथ हिरेमठ (रा. जमखंडी, बागलकोट), रोहित पांडुरंग चव्हाण (रा. माशाळनगर, विजापूर रोड), नागेश तमण्णा जाधव (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्यांनी नावे आहेत.विजापूर रोडवरील हत्तूर गावाजवळ कलवरी ऑर्केस्ट्रॉ बारमध्ये अवैधरीत्या बार सुरू असल्याची माहिती विजापूरनाका पोलिसांना मिळाली होती. सापळा लावून या बारवर छापा घातला असता, काही महिला अश्लिल हावभाव करीत नृत्य करत होते, तर काहीजण मद्यप्राशन करत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी दहाजणांना अटक केली असून, 27 लाख 89 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज मुलाणी करीत आहेत. न्यायालयाने मॅनेजर वैभव माळशिकरे व कामगार अजय क्षीरसागर यांना पोलीस कोठडी सुनावली असून, इतर आरोपींना जामिन मंजूर केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.