पुणे,दि.०६:-पुणे परिसरातील उरळी देवाची येथे गोळीबार करुन एका व्यावसायिकाला लुटल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरवारी (दि.5) रात्री दहाच्या सुमारास उरळी देवाची येथे घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खंडु भिकाजी बाळसराफ (वय-53 रा. शिंदेवस्ती, जुना पालखी रोड, उरळी देवाची) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत.त्यांची उरुळी देवाची येथील जूना पालखी रोड येथे राज ट्रेडिंग कंपनी आहे. तसेच आयस्क्रीम गोडाऊन आहे.गुरुवारी रात्री काही कामानिमित्त ते गोडावूनमध्ये गेले होते.त्यावेळी 20 ते 30 वयोगटातील तीन अनोळखी व्यक्ती रात्री 10 च्या सुमारास गोडावूनमध्ये आले.त्यांनी पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवला. तसेच शिवीगाळ केली.एकाने पिस्तूलातून जमिनीवर गोळी झाडत त्यांच्याकडे असलेली 20 ग्रॅम सोन्याची अंगठी, रोख रक्कम, तीन मोबाईल असा एकूण 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एन.एस. निंबाळकर करीत आहेत.