यशस्वी’ संस्था व नेहरू युवा केंद्राचा संयुक्त उपक्रम
पुणे : दि २३ :- जपानमधील टोक्यो शहरात सुरु होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहनपर शुभेच्छा देण्यासाठी पुण्यातील ‘यशस्वी’ संस्था व केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र पुणेचे उप संचालक यशवंत मानखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हॅशटॅग हमारा व्हिक्ट्री पंच’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदकांचे लक्ष्य भारतीय खेळाडूंनी समोर ठेवले आहे. त्यांचा हा संकल्प यशस्वी होवो अशी सदिच्छा व्यक्त करत यावेळी उपस्थित सर्वांनी हॅशटॅग हमारा व्हिक्ट्री पंच असा जयघोष केला.
यावेळी उपस्थित पुण्याच्या नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी सिद्धार्थ चव्हाण म्हणाले की, कोरोना साथरोगाच्या सावटाखाली होत असलेल्या आणि ‘गेम्स ऑफ होप’ मानल्या जाणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धा कोरोना साथरोगामुळे वर्षभरासाठी स्थगित करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या ऑलिम्पिक स्पर्धेकडे आशेचा किरण म्हणून पाहिले जावे व भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देऊयात असे मत व्यक्त केले.
यावेळी ‘यशस्वी’ संस्थेच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका मनिषा खोमणे यांच्या हस्ते सिद्धार्थ चव्हाण यांना प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र भेट स्वरूपात देऊन त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत ‘यशस्वी’ संस्थेचे संचालक अजय रांजणे, प्रशासन विभाग प्रमुख प्रसाद शाळीग्राम यांच्यासह ‘यशस्वी’ संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘यशस्वी’ संस्थेच्या शिवाजीनगर येथील हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी स्किल सेंटर येथेही केंद्र प्रमुख स्निग्धा यांच्या व अन्य प्रशिक्षकांच्या उपस्थितीत हा उपक्रम साजरा करण्यात आला.