पुणे दि २२ :- राज्यात पर्यटनाची वाढ करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना होती. पर्यटन धोरणाच्या उद्दीष्टांच्या पुर्ततेसाठी तसेच राज्यात पर्यटन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आणि विकासासाठी तसेच पर्यटनाच्या माध्यमातुन पर्यटन स्थळांचा विकास, स्थानिकांना आणि युवकांना रोजगार निर्मिती, व पर्यटन स्थळी पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यरत आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पर्यटक निवासे आणि मोकळया जागा या निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय पर्यटन स्थळांच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी येत असलेल्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना, स्थानिकांना, युवकांना रोजगार उत्पन्न होवुन पर्यटन स्थळाचा सर्वागिण विकास व्हावा, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नेहतीच सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे असलेल्या मोकळ्या जमिनी आणि विकसित केलेल्या मालमत्तांना भागिदारी तत्त्वावर (PPP) विकसित करून राज्यातील काही निवडक पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यात येणार आहे. त्यानुसार 4 आणि 5 तारांकित पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिक यांच्याबरोबर भागिदारी होणार असल्याने पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करणे आणि स्थानिकांना आणि युवकांना रोजगार निर्माण करणे तसेच पर्यटन स्थळाचा वेगाने विकास करणे या गोष्टी शक्य होणार आहेत.
त्या अनुषंगाने पर्यटन क्षेत्रातील 4 तारांकित आणि 5 तारांकित पर्यटन व हॉटेल व्यावसायिक यांचेशी भागिदारी मुळे मोठया प्रमाणावर गुंतवणुक होणार असल्याने पर्यटनासाठी मोठया प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. पर्यटकांसाठी पर्यटन स्थळी तारांकित दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. अम्यझमेंट पार्क, साहसी क्रिडा आणि वॉटर पार्क विकसित होणार आहेत. तसेच पारंपारिक पर्यटन स्थळे आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे जगाच्या नकाशावर आल्याने देशी आणि परदेशी पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. महाराष्ट्राची लोककला, खाद्यसंस्कृती, निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड किल्ले, थंड हवेची ठिकाणे आणि निसर्गसंपन्न डोगररांगा या ठिकाणी पर्यटन मोठया प्रमाणावर विकसित होणार आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचा पर्यटन वाढविण्यासाठी उपयोग करुन घेता येणार आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातुन स्थानिकांना तसेच युवकांच्या रोजगार निर्मितीवर भर देता येणार आहे. पंच तारांकित दर्जाच्या सुविधांची निर्मिती झाल्यामुळे परेदशी पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांविषयी माहीती मिळण्याबरोबरच पर्यटन स्थळांविषयी आकर्षण निर्माण होवुन पर्यटन विकसित होण्यास मदत होणार आहे.
पर्यटन क्षेत्रात सध्या कोरोना महामारीमुळे आलेली मरगळ या निर्णयामुळे कमी होणार असुन पर्यटन क्षेत्र नव्याने उभारी घेणार आहे. पर्यटकांना पंचतारांकित सुविधा उपलब्ध होणार असल्याने स्थानिक व्यावसायिक, टुर ऑपरेटर, टॅ्व्हल कंपन्या आणि स्थानिक उत्पादनांना नव्याने बाजारपेठ मिळणार आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाराष्ट्रात असलेल्या काही निवडक मोकळ्या जमिनी आणि पर्यटक निवासांना भागिदारी तत्त्वावर (PPP) विकसित करून राज्यातील पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यात येणार आहे. शासकिय जमिनींचा / मालमत्तांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी पी.पी.पी. / जॉईंट व्हेंचर / नॉन-जॉईंट व्हेंचर / प्रवर्तन आणि व्यवस्थापन करार किंवा फक्त व्यवस्थापन करार (O & M Contract or only Management Contract) इ. उपलब्ध विविध पर्यायांचा विचार करुन निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार सदरच्या मालमत्ताचा विकास करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. सदरच्या निविदा महामंडळाच्या www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.प्रथम टप्प्यामध्ये माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर (जि. रायगड), मिठबांव रिझॉर्ट आणि मोकळी जागा, (जि. सिंधुदुर्ग) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास, ताडोबा आणि फर्दापुर, जि. औरंगाबाद येथील मोकळया जमिनींचा विकास करण्यात येणार आहे. तदनंतर अन्य पर्यटन क्षम स्थळांची / ठिकाणांची निवड पर्यटन क्षमतेचा विचार करुन शासन मान्यतेने करण्यात येणार आहे. यामुळे नजिकच्या काळामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवर तारांकित दर्जाच्या अतिअत्तम सुविधा निर्माण होणार असुन पर्यटनास चालना मिळणार आहे, अशी माहीती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे यांनी दिली आहे.
.