पुणे,दि.26 :- पदोन्नतीतील आरक्षण देण्यात यावे या व संविधानिक हक्क व आरक्षण संपविण्याच्या षड्यंत्राविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आरक्षण हक्क कृती समिती पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे राज्य सहसचिव तथा आरक्षण राज्य आरक्षण हक्क कृती समितीचे सदस्य डॉ.बबन जोगदंड व मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे संजय घोडके, बानाईचे अध्यक्ष पांडुरंग शेलार यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुणे शहरातील विविध संघटनाचे प्रतिनिधी,राजकीय संघटनांचे प्रतिनिधी मोठया संख्येने सहभागी झाले होते.पदोन्नतीतील आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने राज्यभर आक्रोश मोर्चाची हाक दिली होती.यानुसार पुण्यामध्ये सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हा मोर्चा काढण्यात आला. प्रारंभी आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास डॉ. बबन जोगदंड पांडुरंग शेलार व संजय घोडके यांनी पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात केली.राज्य शासनाने 7 मे 2021 रोजी पदोन्नतीच्या आरक्षणाच्या विरोधी शासन निर्णय काढून मागासवर्गीयांच्या पदोन्नतीवर गदा आणली आहे .हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा,मागासवर्गीयचा नोकऱ्यातील अनुशेष भरण्यात यावा या व इतर विविध मागण्यासाठी हा मोर्चा होता.
या मोर्चाची भूमिका आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य प्रतिनिधी संजय घोडके यांनी मांडली. त्यानंतर डॉ. संजय दाभाडे, रिपाईचे नेते परशुराम वाडेकर, राहुल डंबाळे यांनी भविष्यामध्ये पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न शासनाने जर लवकर सोडविला नाही तर आरक्षणाच्या मागणीसाठी व्यापक लढा उभारावा लागेल,असे सांगितले. मोर्चेकऱ्यांनी यावेळी अनेक घोषणा दिल्या. त्यामध्ये पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवून तात्काळ मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना बढती देण्यात यावी, त्याचबरोबर मागासवर्गीयांवरील अन्याय-अत्याचार रोखण्यात यावेत. आरक्षणासाठी जी समिती स्थापन केली त्याचे अध्यक्ष बदलण्यात यावेत या व इतर मागण्यांचा या मध्ये समावेश होता. या मोर्चामध्ये सतिश गायकवाड,सुनील माने, राम सर्वगोड, विकास जाधव, दिलीप तोसिफ शेख, दिलीप पवार,आनंद जोगदंड, रवींद्र पारधे, संजय सोनवणे,राजू गायकवाड,प्रवीण धीवार,आनंद जाधव, प्रकाश पवार,राहुल भातकुले, विनोद चांदमारे, सुगत शांतेय, दीपाली चव्हाण, उमाकांत कांबळे,रतन दवणे, सुभाष सूर्यवंशी, किशोर अहिवळे,राहुल मोरे,सुहिता ओव्हाळ, महेंद्र गायकवाड, राहुल कांबळे फोटोझिंको मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी संघटना, कास्ट्राईब कल्याण कर्मचारी महासंघ,महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंजिनीअर असोसिएशन, रिपब्लिकन कर्मचारी फेडरेशन, ससून मागासवर्गीय संघटना चर्मकार कर्मचारी संघटनां एलआयसी मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी संघटना या सह जवळपास पन्नास संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.मोर्चेकऱ्यानी निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.