पुणे दि १२ :- पावसाची रिमझिम, धुक्याची दुलई, स्वच्छंद आणि मनमोहक धबधबे, निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल आणि आल्हाददायक थंडी – अनुभवण्यासाठी या माळशेज घाटला…
आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर – कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जिथे घाट रस्ता सुरू होतो, तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिझॉर्ट आहे. या पर्यटक निवासामध्ये 46 सुंदर सुट असुन त्यापैकी काही AC सुटही आहेत. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे. या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो.पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट. हा राष्ट्रीय महामार्ग २२३ वरील घाट आहे. इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’. फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून पावसाळी सहल सहज घडेल.मागे हरिश्चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी नक्कीच माळशेजला जावे.हे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. उंच डोंगर, टेकडी तसेच विविध धबधब्यांनी नटलेला असा हा परिसर पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो. विशेष म्हणजे पश्चिम घाट म्हणून जागतिक वारसा यादीत हा परिसर आहे. येथे दुर्मिळ पशू-पक्षी आढळून येतात. घाटात वर्षभर पर्यटकांची वर्दळ असतेच, परंतु पावसाळ्यात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कितीतरी वाढते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत घाटात विविध ठिकाणी पार्किंग व प्रेक्षणीय स्थळे (व्ह्यू पॉइंट्स) तयार करण्यात आली आहेत. या घाटाचे सौंदर्य विचारात घेता आणि पर्यटकांचा घाटात येण्याचा ओढा बघता या सुविधा कमी पडतात म्हणून घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महांडळाच्या निवासा शेजारील टेकडीवर जागतिक दर्जाचा ‘स्काय वॉक’ काचेचा पारदर्शक स्काय वॉक बांधणे व प्रेक्षक गॅलरीसाठी इमारत बांधणे, तसेच पर्यटकांच्या दृष्टीने सौंदर्यीकरण व बागकाम करणे प्रस्तावित करण्यात आले आहे. (सोर्स विकीपिडीया) वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतुक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे. अशावेळी शहरापासुन दुर निसर्गरम्य ठिकाणी मनमुराद पावसाचा आणि दाट धुक्याचा अनुभव घेण्यास पर्यटक आसुसलेले आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास माळशेज घाट-महामंडळाची पुणे विभागातील भिमाशंकर, कार्ला (लोनावळा), पानशेत, कोयनानगर माथेरान आणि माळशेज घाट ही पर्यटक निवासे सुरु असुन त्यापैकीच निसर्गसंपन्न ठिकाणी असलेल्या माळशेज येथे हे पर्यटक निवास आहे. दरीत घुसलेल्या एका पठारावर खाशा पर्यटकांच्या विशेष सोयीसाठी हे पर्यटक निवास बांधण्यात आलं आहे. वेगवेगळया प्रकारचे 46 सुट या पर्यटक निवासात असुन अत्यंत चांगल्याप्रकारे पर्यटकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. इथुन जवळच दरीतील पाहण्यासारखी नयनरम्य ठिकाणे असल्याने या पर्यटक निवासात आता पर्यटकांची रिघ वाढली आहे. याठिकाणी सर्वसामान्यांपासुन उच्चवर्गियांपर्यंत सर्वासाठी परवडतील अशा वेगवेगळया प्रकारच्या खोल्या उपलब्ध आहेत. अत्यंत रुचकर जेवणासाठी इथले उपहारगृह प्रसिध्द आहे. खाशा खवय्यांसाठी इथे स्वादीष्ट मेजवानीचा बेत करण्यात येत आहे.
खास आकर्षण –
कोसळणारा पाऊस, आल्हाददायक कानात शिळ घालणारा वारा आणि दाट धुक्याच्या दुलईमध्ये चिंब भिजत लाईफ साईज सोंगटयांसोबत बुध्दीबळाचा डाव खेळण्यासाठी इथे खास व्यवस्था करण्यात आली आहे. इथे एका मोठया स्टेजवर बुध्दीबळाचा पट तयार करण्यात आला असुन साधारणपणे 4 फुट उंचीची बुध्दीबळाची सोंगटी तयार करण्यात आली आहेत. या पटावर आपल्या परिवारासोबत अविस्मरणीय बुध्दीबळाचा डाव मांडण्याचा दुगधशर्करा योग महामंडळाने खास पर्यटकांसाठी तयार केला आहे. या पटावर ओल्याचिंब पावसात भिजत बुध्दीबळ खेळण्याचे हे गुलाबी क्षण यादगार करण्यासाटी पर्यटकांची चढाओढ सुरु आहे. आपणही या अनोख्या खेळाचा धुक्याच्या आणि उबदार थंडीच्या साथीने आनंद घ्यावा, असे महामंडळाने आवाहन केले आहे.
सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण, येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा, तसेच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, कर्मचाऱ्यांसाठी मुखपटटी, फेसशिल्ड, हातमोजे इ. व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणुन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. आगामी काळात कंटाळलेल्या पर्यटकांसाठी ‘वर्क फ्रॉम नेचर’ ही संकल्पना या ठिकाणीही राबविण्यात येणार आहे तसेच“प्री-वेडींग फोटो शुट”, “डेस्टिनेशन वेडींग” यासाठीही विशेष तयारी करण्यात येत आहे.
आगामी काळात महामंडळाकडुन देण्यात येणाऱ्या सोयी आणि सवलतींबाबत तसेच माळशेज घाट येथील पर्यटक निवासाच्या बुकिंगसाठी अधिक माहीतीसाठी महामंडळाच्या www.maharashtratourism.gov.in या वेब साईटवर किंवा 9373808151 या क्रंमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक, दिपक हरणे यांनी केले आहे.
सामाजिक, व राजकीय, पर्यटन प्रतिनिधी संकेत संतोष काळे