संपूर्ण जगात आज रोजी कोरोनाव्हायरस या महामारी चे मोठे संकट आलेले आहे. उभ्या जगाशी गनिमी कावा खेळणाऱ्या हा दुष्ट विषाणु मुळे आपला भारत देश पण प्रभावित झालेला आहे. विश्व महायुद्धानंतर नजीकच्या काळात संपूर्ण जगावर आलेले हे फार मोठे संकट असून याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दुष्परिणाम हा पुढील अनेक वर्ष सोसावा लागणार आहे. आपल्या देशापेक्षा प्रगत असलेल्या अनेक प्रगतीशील देशात सुद्धा या व्हायरसमुळे हाहाकार माजवला आहे. आपले देशात आपल्या सध्याच्या सरकारांनी घेतलेल्या ठोस उपाययोजनांमुळे आजच्या तारखेपर्यंत आपण म्हणावे तसे इतर युरोपियन राष्ट्रांतप्रमाणे बाधित झालेलो नाही परंतु यापुढेही प्रभावी योजना राबविण्यात आल्या नाही तर अधिक गंभीर परिस्थिति उद्भवण्याची शक्यता नाकारता येत. या संकटाचा सामना करत असताना आपल्या सरकारने घेतलेला संचारबदीचा निर्णय हा कोरोनाव्हायरस च्या वेगाने वाढणाऱ्या प्रसाराला थांबवण्यासाठी अतिशय गरजेचा होता परंतु त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक दुष्परिणाम होणार आहे. त्यात संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती खराब होणे, रोजगार -नोकरी काम धंदा यांचे प्रश्न तयार होने, जीडीपी चा रेट कमी होने तसेच संपूर्ण देशात सुमारे वीस वर्षे मागे जाण्याचा अंदाज काही तज्ञ वर्तवीत आहेत. आता साधारणतः परिस्थिति इतर देशाचे उदाहरणे व आपल्या सरकारचे प्रयत्न बघता ही परिस्थिति जून-2021 पर्यन्त सुधारणे अपेक्षित आहे. त्यानंतरही सरकारकडे पर्यटन या क्षेत्रशिवाय अन्न , आरोग्य, रोजगार, ई . प्राधान्याचे विषय असणार आहे. या संकटामुळे पर्यटन व्यवसायाच्या उत्पन्नामध्ये बऱ्याच प्रमाणात घट झालेली आहे व पुढील काळातही जोपर्यंत परिस्थिती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत दूरगामी परिस्थितीत सुद्धा अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या महामारी नंतरच्या काळात घेतल्या जाणाऱ्या तातडीच्या व दीर्घकालीन उपायोजना आखून येणाऱ्या दिवसांसाठी एक निश्चित रोड मॅप प्लान तयार करण्यात आला असुन दीर्घकालीन उपाय योजना राबविण्यात येत आहेत.
सध्याच्या वातावरणामुळे सर्वाधिक परिणाम हा पर्यटन उद्योगावर झाला आहे. संचारबंदी मुळे सर्वच बाबतीत मर्यादा आल्या आहेत. तथापि, या काळामध्येही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कर्मचारी सतत काम करीत आहेत. स्वच्छता हीच सेवा आणि अतिथी देवो भव ही ब्रीद वाक्य उराशी बाळगुन संचारबंदी असली तरिही पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि सॅनिटायझेशनची कामे योग्य ती खबरदारी घेवुन सुरु करण्यात आली आहेत. पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना केल्याने आणि पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात यशस्वी झाली असल्याने डिसेंबर आणि जानेवारी साठी सर्व पर्यटक निवासे 100 टक्के फुल झाली होती.
या महामारी च्या दरम्यान सर्व लोक घरी बंदिस्त अवस्थेत असल्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रचंड त्रासलेले आहेत अशा परिस्थितीत अशा पर्यटकांना लॉकडाऊन नंतर बाहेर पडण्याची इच्छा होणार आहे त्यासाठी ही मंडळी पर्यटनास येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच येणाऱ्या दिवसात भारतातील देशी पर्यटक हे बाहेरच्या देशातील वातावरण बघून कुठेही परदेशी पर्यटनासाठी जाणार नाही त्यांना महामंडळाच्या माध्यमातून राज्य- देशांतर्गत पर्यटनाच्या सोय उपलब्ध करून देण्यासाठी उपयोजना आखणी करणे आवश्यक आहे.
सध्याच्या वातावरणाचा वेलनेस – मेडिकल टुरिझम या विषयांचा वापर करून घेता येणे शक्य आहे. ज्यात समजा एखाद्या व्यक्तीला स्वतः करोंनाचा संसर्ग झालेला असला किंवा त्याच्या नातेवाईकांना असा संसर्ग झाला असेल अशा लोकांसाठी एक चांगले पॅकेज त्यांचे वेलनेस साठी करून देणे पण एक पर्याय असू शकतो. या महामारीच्या दरम्यान आपण सर्व लोकांनी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून पूर्ण जगाचे चित्र बघितले आहे आतापर्यंत आपण ज्या परदेशी पर्यटन स्थळांचे आकर्षण बाळगत फोटो त्या पर्यटक स्थळांची झालेली वाताहत पण आपण बघितलेली आहे त्यामुळे देशी पर्यटकांची परदेशात जायची ओढ भविष्यात कमी होणार आहे. आशा वेळी देशी पर्यंटकांवरती लक्ष केंद्रित करणे हे गरजेचे असणार आहे. या परिस्थितीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापुढे संपूर्ण पर्यटन व या व्यवसायासाठी अतिशय मर्यादित चलन हे बाजारात राहणार आहे. त्यामुळे शक्यतो पर्यटकांसाठी स्वस्तातील आणि मर्यादीत पॅकेज असावेत अर्थात ज्या सुविधा आहेत त्या उत्तम दर्जाच्या ठेवून थोडे त्याचे बचत तंत्र वर्कआउट करणे गरजेचे आहे. येणाऱ्या दिवसात सरकार किंवा पर्यटन विभाग हे पर्यटन उद्योगाला या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी काय मदत करते ते बघून त्याप्रमाणे उपाय योजना करता करणे आवश्यक असणार आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतुक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे. अशावेळी शहरापासुन दुर निसर्गरम्य ठिकाणी जावुन रहावे आणि सोबत कामही करावे असे वाटणे साहजिक आहे.
सध्यस्थीतीत पर्यटन व्यवसायिकांनी मोठ्या /लांब/ दीर्घ लक्ष असलेल्या व त्यापासून दीर्घ मुदतीत प्राप्त होणाऱ्या महसुलाऐवजी छोटे प्रकल्प व लवकर उत्पन्न देणारे प्रकल्प, उपहारगृह, छोटे गुंतवणुकीचे साधने अशा प्रकल्पा वरती लक्ष केंद्रित करावे म्हणजे कमी गुंतवणुकीतून चांगला फायदा नजीकच्या काळात मिळू शकेल. या महामारीच्या काळामुळे जवळपास सहा महिने वाया गेले असून या कालावधीत झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील महीने अतिरिक्त काम करून हा काल अपव्यय भरून काढणे क्रमप्राप्त आहे.
तथापि, आगामी काळात पर्यटकांना वेगवेगळया प्रकारे आकर्षित करुन पर्यटन व्यवसायास भरभराटी येवु शकेल. मात्र सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करणे. त्याचबरोबर पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना साधारणतः पुढील वर्षासाठी करणे व पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देणे. तसेच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्थाही करणे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे आणि शासनाने पर्यटकांचे वैद्यकिय प्रमाणपत्र पाहणे बंधनकारक केल्यास त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
उपरोक्त प्रमाणे कार्यवाही केल्यास पर्यटन उद्योग नक्कीच पर्यटन उद्योग भरभराटी कडे वाटचाल करेल याची खात्री आहे.
पर्यटन क्षेत्रात करीयर करण्यासाठी मोठया प्रमाणावर संधी सध्या उपलब्ध आहे. महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यअन संचालनालय यांचेकडुन विविध योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळाकडुन न्याहरी निवास आणि महाभ्रमण या योजना आहेत तर पर्यटन संचालनालयाकडुन कृषी पर्यटन योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा शहरी आणि खेडेगावातील तरुणही उपयोग करुन घेत आहेत. तसेच पर्यटन व्यवसायात करीयर करण्यासाठी महाराष्ट पर्यटन विकास महामंडळाने सोलापूर येथे महाराष्ट् इन्स्टिटयुट ऑफ हॉटेल मॅनेजमेट आणि कॅटरींग टेक्नोलॉजी या संस्थेमार्फत विविध अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत.
महाराष्टात मोठया प्रमाणावर हॉटेल मॅनेजमेंट संस्था आहेत जिथे मोठया प्रमाणावर पर्यटन विषयक अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. सदर बाबत खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
- BA in Travel and Tourism Management
- BA in Hospitality, Travel and Tourism Management
- B.Sc. in Travel and Tourism Management
- BA Tourism Studies
- B.Sc. in Hospitality and Travel Management
- BBA in Travel and Tourism Management
- BBA in Hospitality and Travel Management
- BBA in Air Travel Management
- Bachelor of Tourism Studies
- Bachelor of Tourism Administration
- B.Com. Travel and Tourism Management
- BA Travel and Tourism
- B.com Vocational Tourism degree.
उपरोक्त अभ्यासक्रम सध्या उपलब्ध असुन हॉटेल मॅनेजमेंट, ट्व्हल आणि टुरीझम क्षेत्रात सध्या मोठया प्रमाणावर संधी उपलब्ध आहे. सध्या या क्षेत्राला थोडा फटका बसला असला तरी कोरोना कालावधीनंतर सदरच्या क्षेत्राला मोठया प्रमाणावर भरभराट येणार असुन आगामी दोन वर्षांसाठी देशाअंतर्गत पर्यटनास नक्कीच बहर येणार आहे.
दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थाक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे