मुंबई दि २८ :- पोलिसांनो, याद राखा! अवैध धंदे जर माझ्या हद्दीत चालू राहिले तर परिणामाची तयारी ठेवा. पुरावे सापडल्यास अगदी साध्या शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱयांना तत्काळ निलंबित करण्यात येईल, असा इशारा मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. अवैध डान्स बार, रेस्टॉरंट बार, ऑर्केस्ट्रा बार, पब्स, डिस्को थेक्स, मसाज सेंटर, हुक्का पार्लर, कुंटणखाने, जुगार, दारूचे अड्डे इत्यादी अवैध धंदे जर चालू राहिले तर कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱयांनीही लक्षात ठेवावे. कुणी हॉटेलवाले किंवा कोणत्याही आस्थापनाच्या मालकांनी नियम पाळले नाहीत तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असा ठोस दम देताना नांगरे पाटील पुढे म्हणतात, अवैध धंदे 100 टक्के मला बंद हवेत.आता ‘झीरो टॉलरन्स’! पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे तसे आदेशच आहेत. आता कुणाची गय केली जाणार नाही, असाही इशारा नांगरे पाटील यांनी दिला आहे.
नार्कोटिक्सचा व्यवसाय करणाऱया गुन्हेगारांवर तडीपारीसारखी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. अमली पदार्थांच्या अड्डय़ांवर धाडी टाकाव्यात. उपायुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी यात लक्ष घालावे. त्यांच्याकडून दुर्लक्ष झाल्यास त्यांनाही विभागीय चौकशीला सामोरे जावे लागेल, असाही इशारा नांगरे पाटील यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या वतीने दिला आहे.
पोलीस ठाण्यात वारंवार ‘ट्रॅप’ होतात. असे आता येथून पुढे होता कामा नये. नाईट राऊंड नियमितपणे झाले पाहिजेत, अशाही सूचना नांगरे पाटील यांनी मुंबईतील सर्व पोलिसांना दिल्या आहेत. सचिन वाझेने केलेल्या दुष्कृत्यानंतर सारे पोलीस दल हादरून गेले आहे. पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याने मुंबईच्या आयुक्तांनी ती सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे सांगण्यात येते.