तथापि, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून थोडेसे चित्र बदलले असून सध्या पुणे जिल्ह्याची बाधित रुग्णांची टक्केवारी १० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. कोरोना अजूनही संपलेला नाहीए, त्यामुळे आपणा सर्वांनाच आवश्यक ती दक्षता घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवडयातील बाधित रुग्णांची टक्केवारी पाहता अमरावती (४१.८ टक्के), अकोला (३२.७ टक्के), बुलढाणा (२७.४ टक्के), यवतमाळ (२२.५ टक्के), नागपूर (१८.३ टक्के), वर्धा (१७.८ टक्के), नाशिक (१६.१ टक्के), रत्नागिरी (१५.८ टक्के ), वाशीम (१०.७ टक्के) यासह पुणे (१० टक्के) जिल्हा १२ व्या क्रमांकावर आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णवाढीचा दर लक्षात घेता सर्व यंत्रणा दक्ष करण्यात आल्या आहेत. केंद्र शासन, राज्य शासन यांच्याकडील आदर्श कार्यप्रणालीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सूत्र अंमलात आणण्यात येत आहे. महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, ग्रामपंचायत यंत्रणा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यंत्रणा कोविड प्रतिबंधाकरिता फेरकार्यान्वित करण्यात आली आहे.
कोविड व्यवस्थापनाचे मॉडेल – कोविड प्रमाणित कार्यप्रणाली कार्यान्वित करणे- ट्रॅकींग (रुग्ण शोध), टेस्टींग (तपासणी)आणि ट्रीटींग (उपचार) या थ्री टी वर भर देण्यात येत आहे. बेड व्यवस्थापन, खाजगी रुग्णालयांचा सहभाग वृद्धिंगत करणे, दंडात्मक व कायदेशीर कारवाई वाढविणे व व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
कोविड लसीकरण व्यवस्थापन– हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व पंचायत राज संस्थांमधील अधिकारी/कर्मचाऱ्यांचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करणे. लसीची उपलब्धता, शीतसाखळी व्यवस्थापन, लसीकरण सत्रांची संख्या यांचे व्यवस्थापन करणे.
औषधे साधनसामुग्री, यंत्रसामुग्री उपलब्धता- कोविडकरिता आवश्यक औषधे व साधनसामुग्री यांची उपलब्धता करणे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स व क्रिटीकल रुग्ण व्यवस्थापन करणे आदीवर भर देण्यात येत आहे.
पुणे महापालिका क्षेत्रात बिबवेवाडी, कोथरूड, हडपसर, सिंहगड रोड तर पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात चिंचवड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, थेरगाव, मोशी, भोसरी, चिखली आणि काळेवाडी तसेच पुणे ग्रामीणमध्ये शिरूर तालुक्यात (नगर पालिका, शिक्रापूर, गिरवी, तळेगाव ढमढेरे, करडे, पिंपळे जगताप) येथे रुग्णांचे प्रमाण वाढलेले आढळून आले आहे.
हवेली तालुक्यात (वाघोली, न-हे, नांदेडसिटी, कदमवाकवस्ती, कोलवडी, दौंड तालुक्यात (गारबेटवाडी, पाटस), मावळ तालुक्यात तळेगाव नगर पालिका, जुन्नर तालुक्यात नारायणगाव, खेड तालुक्यात वाकी खुर्द आणि मुळशी तालुक्यात सुस येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहेत.
पुणे जिल्ह्यातील नमुना तपासणी वाढविण्याकरिता करण्यात येत असलेली उपाययोजना- कोविड केंद्रे, महानगरपालिका दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी कोविड करिता नमुना संकलन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात ९ शासकीय व २४ खाजगी प्रयोगशाळा सुरु आहेत. सर्व शासकीय व खाजगी प्रयोगशाळा यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करून नमुना तपासणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
सुपर स्प्रेडरचे विशेष सर्वेक्षण करून तापसदृश्य आजाराच्या रुग्णांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत व त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. दैनंदिन आयएलआय तसेच सारी रुग्ण सर्वेक्षण सुरु असून संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. संपर्क शोध प्रभावी करून कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त शोध घेऊन नमुना तपासणी वाढविण्यात येत आहे.
अडचणी- एनआयव्ही, आयसर, नारी व एनसीसीएस या केंद्र शासनाच्या प्रयोगशाळा असून या ठिकाणी तपासणी संख्या कमी करण्यात आलेली आहे. तेथे तपासणी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यापैकी आयसर या ठिकाणी परत तपासणी सुरु झाली असून 200 पर्यंत तपासणी करण्यात आहे. बीजे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी तपासणी क्षमता 1700 पर्यंत वाढविण्यासाठी आरएनए एक्सट्रॅक्टर आणि पीसीआर मशीनची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. एएफएमसी, कमांड हॉस्पीटल या संरक्षण विभागाच्या संस्थांमध्ये फक्त संरक्षण विभागातील अधिकारी- कर्मचारी यांचीच तपासणी करण्यात येत असून त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची तपासणी होणे आवश्यक आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी केलेली कार्यवाही- समन्वय समितीची सभा घेवून त्यामध्ये कोरोनाचा पुढील संसर्ग रोखण्याबाबत चर्चा करण्यात आली. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना झूम कॉल व्हिसी द्वारे प्रशिक्षण देण्यात आले असून बेड व्यवस्थापन व उपचार कार्यप्रणाली याबाबत सखोल चर्चा करण्यात आली आहे. जनतेमध्ये जाणीव जागृती होण्यासाठी मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स, भारतीय जैन संघटना आणि इतर सामाजिक संघटना यांची संयुक्त बैठक घेण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कोविड प्रतिबंधाबाबतच्या सूचनांनुसार हॉटेल, बार, मंगल कार्यालय व गर्दीच्या ठिकाणी संबंधितांनी प्रमाणित कार्यप्रणालीचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व प्रसंगी गुन्हे दाखल करण्याविषयी यंत्रणांना आदेश देण्यात आलेले आहेत.
हॉटस्पॉट भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रभावी नियोजन, प्रतिबंधित क्षेत्राची (कन्टेन्मेंट झोन) प्रभावीपणे अंमलबजावणी,आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या ताप सदृश्य रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी करणे बंधनकारक, संपर्क शोध मोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबविण्याचे धोरण, नागरिकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आदींचा समावेश आहे.
कोविड कृती आराखडा– नमुना तपासणीमध्ये वाढ करणे, क्षमता संवर्धन, प्रभावी संपर्क शोध व दैनंदिन सर्वेक्षण, हॉटेल्स, मंगल कार्यालय, गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या ठिकाणी दंडात्मक कारवाई प्रभावी करणे, सार्वजनिक ठिकाणांचे दृश्य स्वरुपात निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही पुनश्च कार्यान्वित करणे. बेड व्यवस्थापन, ऑक्सिजन पुरवठा, औषधसाठा उपलब्धता याबाबत नियमित आढावा. मास्कचा वापर करणे, किमान ६ फुटाचे अंतर ठेवणे व वारंवार हात धुणे याबाबत व्यापक जनजागृती करणे.
लसीकरण वाढविण्याकरिता करण्यात आलेले नियोजन- दैनंदिन व्हीसीद्वारे मनपा व ग्रामीण कार्यक्षेत्रातील यंत्रणांना हेल्थ केअर वर्कर्स व फ्रंट लाईन वर्कर्स यांना लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. स्थानिक वर्तमानपत्रातून, केबल नेटवर्क व सोशल मिडीयाद्वारे लसीकरण वाढविण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. कोविड लसीकरण केंद्रामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत पुणे महापालिका क्षेत्रात २९, पिंपरी-चिंचवड महापालिका ८ व ग्रामीण भागामध्ये ४७ लसीकरण केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, पंचायत राज संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी यांना लस घेण्याबाबत प्रोत्साहन देण्यात येत आहे.
रुग्णालयीन व्यवस्थापन– जिल्ह्यात कोविड आरोग्य केंद्र 75, समर्पित कोविड आरोग्य केंद्र 209 व समर्पित कोविड रुग्णालय 103 आहेत. या ठिकाणी ऑक्सिजन विरहित बेड्स40 हजार 419, ऑक्सिजन बेड्स 7 हजार 69, आयसीयू बेड्स 2 हजार 617 तर व्हेंटीलेटर 1200 आहेत. क्रियाशील रुग्णसंख्या कमी झाली असल्याने काही ठिकाणचे कोविड आरोग्य केंद्र, समर्पित कोविड आरोग्य केंद्र व समर्पित कोविड रुग्णालय येथील खाटांची संख्या काही प्रमाणात कमी करण्यात आलेली असून रुग्णसंख्या वाढल्यास पुनर्जीवित करण्यात येणारआहे.
कोविड पश्चात तपासणी व समुपदेशन (पोस्ट कोविड कौन्सिलिंग) – पुणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण ३९३ रुग्णांना समुपदेशन व तपासणी करण्यात आलेली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये एकूण २१२ रुग्णांना तर पुणे ग्रामीणमध्ये एकूण 11 हजार 790 रुग्णांना समुपदेशन व तपासणी करण्यात आलेली आहे
नायडू रुग्णालय, ससून रुग्णालय, बाणेर (समर्पित कोविड रुग्णालय) जिल्हा रुग्णालय, औंध (पुणे), सर्व उप जिल्हा ग्रामीण रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कोविड पश्चात समुपदेशन सुविधा उपलब्ध आहे.
पुणे ग्रामीण भागातील रुग्णवाहिकांची उपलब्धता- 102 सुविधेमार्फत 92 रुग्णवाहिका तर 108 सुविधेमार्फत 41 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. ग्रामीण भागात अधिग्रहित 52 रुग्णवाहिका आहेत. 14 व्या वित्त आयोगातून 92 रुग्णवाहिका प्रस्तावित असून त्यापैकी 51 रुग्णवाहिका खरेदी करण्यात आलेल्या आहेत. ग्रामपंचायतींमार्फत भाडेतत्वावर 40 रुग्णवाहिका लावण्यात आलेल्या आहेत. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 5 रुग्णवाहिका खरेदी करण्यात आलेल्या आहेत.
कोरोना प्रतिबंधक लस आलेली असली तरी सर्वसामान्यांना ती मिळेपर्यंत काही काळ जावा लागणार आहे. पुणे जिल्हा तसेच इतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात सतत धूत राहणे ही आपली सर्वांची व्यक्तिगत जबाबदारी राहणार आहे. ती सर्वानी पार पाडणे काळाची गरज आहे. यात हलगर्जीपणा झाल्यास त्याचे परिणाम आपल्यालाच सहन करावे लागणार आहेत.
राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे