पुणे दि २२ :- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ”काही दिवसांत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुढील आठ-दहा दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल,” असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.शहराच्या मुख्य बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे व पुणे परिसरातील गर्दी पाहिल्यानंतर कोरोना गर्दीत चेंगरून मेला की काय असे वाटले, असे अजित पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला.पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पवार पुढे म्हणाले, ”युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. इंग्लंडमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून, शक्य तेवढी खबरदारी घेऊनच येणाऱ्या काळात संकटाचा मुकाबला करायचा आहे. एकदा कोरोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही, हा भ्रम मनातून काढून टाका. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करा, गाफील राहू नका आणि काळजी घ्या.”