मुंबई दि १५ :- शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली असली तरी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी सांगितले. मंदिरांमध्ये दर्शन घेताना भाविकांनी कोरोनाविषयी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनःश्च हरी ओम म्हणत राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू करून अनेक बाबींना परवानगी दिली तरी अनेक महिने मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी दिली नव्हती. अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुढाकाराने मंदिरे उघडण्याची परवानगी मिळण्यासाठी पुनःपुन्हा आंदोलने करावी लागली. भारतीय जनता पार्टीने भाविकांच्या आंदोलनांना सक्रीय पाठिंबा दिला. पण सत्तेसाठी महाविकास आघाडी आंधळी झाली असल्याने ती मद्यालये उघडण्यास परवानगी देत असली तरी देवालये उघडण्यास परवानगी देत नव्हती. देवस्थाने बंद असल्याने त्यांच्या परिसरात भाविकांची सेवा करणाऱ्या व्यावसायिकांची रोजीरोटी बंद झाली होती. कोरोनाचे सर्व निर्बंध पाळण्याची तयारी भाविकांनी दाखवली तरीही हे सरकार कठोरपणे परवानगी नाकारत होते. भाविकांना देवापासून दूर ठेवण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नावर अखेर श्रद्धेने मात केली आणि या सरकारला मंदिरे उघडण्यास परवानगी देण्याची सुबुद्धी सुचली. त्याचे आपण स्वागत करतो. सरकारने भाविकांची सत्वपरीक्षा पाहण्यापेक्षा यापूर्वीच मंदिरे उघडण्याची परवानगी दिली असती तर बरे झाले असते.
त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अजूनही या साथीचा धोका संपलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी मंदिरांमध्ये दर्शन घेताना मास्क वापरणे, अंतर राखणे अशा कोरोनाविषयी सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे अवश्य पालन करून काळजी घ्यावी.