पुणे दि. २७ :- विविध खेळांमध्ये कौशल्य असलेल्या प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ७ ते २० जानेवारी, २०१९ या कालावधीत महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेच्या आयोजनात उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
खेलो इंडिया स्पर्धेच्या आयोजनाच्यानिमित्त उद्योगांनी प्रायोजकत्व स्वीकारावे यासाठी, चाकण परिसरातील उद्योजकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, सहायक क्रीडा अधिकारी नवनाथ फरकाडे यावेळी उपस्थित हेाते.
या स्पर्धेमुळे उत्कृष्ट खेळाडू तयार होतील व ते आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्वल करणार असल्याने, उद्योजकांनी स्पर्धा आयोजनात सहकार्य असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. बैठकीला उपस्थित विविध उद्योगांच्या प्रतिनिधींनी स्पर्धेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला चाकण औद्योगिक वसाहत संघटनेचे अमीत शिंदे, सुनिता पोखरकर, सिध्दांत चोपडा, वैशाली ओसवाल, अल्ताफ पिरजादे, प्रसाद बांदोडकर, पुरातन भारती, अमीत कोच्चर, विजय भटेवरा, के.के.झुणझुणवाला, सुधीर मित्तल, आंचल मदनानी, प्रिती गोसवाडे उपस्थित होते.