मुंबई, दि. ४: कोरोनाच्या भीतीमुळे नात्यांवर कसा परिणाम होतो याचं उदाहरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाशी दोन हात या चर्चासत्राच्या कार्यक्रमात दिलं. आई-मुलाचं नातंसुद्धा कोरोनाच्या भीतीमुळे दुरावल्यासारखे झालं. त्यामुळे आपली नाती तोडू नका, आईशी असलेली नाळ तोडण्याची आपली संस्कृती नाही. कोरोनाची भीती बाळगू नका व कुणालाही वाळीत टाकण्याची मानसिकता ठेऊ नका. शिक्षित व्हावं योग्य ती खबरदारी घ्यावी परंतु नात्यातील, संबंधातील प्रेम-जिव्हाळा कमी होऊ देऊ नका, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ‘कोरोना: अवास्तव भीती व गैरसमज’ याविषयी केलेल्या चर्चेचा तिसरा भाग आज प्रसारीत झाला. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते.. टोपे म्हणाले, लोक भीतीपोटी खूप चुका करतात. एखादा कोरोनाबाधीत झाला तर त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. पनवेलमधील घटनेचे उदाहरण देईल, ज्यामध्ये आई असिम्प्टोमॅटीक होती, ती बरी झाली. ती बरी झाल्यानंतर तिला घरात घ्यायची तिच्या मुलाला भीती वाटायला लागली. त्याला वाटलं आईमुळे मला व घरातील इतरांना प्रादुर्भाव होईल. हा आजार बरा होतो मात्र हा आजार झालेल्यांशी वाळीत टाकल्याप्रमाणे वागू नका. नातेसंबंध जपत आजारावर मात करा.राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये किमान ५००० रुग्ण असे आहेत ज्यांचं वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. ९० वर्षे वयापुढील जवळजवळ ६०० लोक बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता सावधतेने आणि काळजी घेऊन त्याचा सामना करा.नागरिकांना दिलासा देताना आरोग्यमंत्री म्हणाले, कोरोनाबाधित रुग्ण १०-१२ दिवसांमध्ये या आजारातून बाहेर पडू शकतात. ही लक्षणांवर आधारीत उपचार पद्धती आहे. त्यात काही मोठी शस्त्रक्रिया वगैरे असे काहीच नाही. सायटोकॉईन स्टॉर्म मध्ये आपले शरीर आपल्याच सेल्सला मारते. सायटोकॉईन स्टॉर्म चे एक कारण कधीकधी काहीशी भीतीसुद्धा असते. त्यामुळे भीती बाळगू नका. आपल्याला प्रादुर्भाव होऊ नये ह्या गोष्टीचे आपण शिक्षण घ्यावे. आपण काळजी घेऊन काम केले तर काही अडचण येत नाही. भीती न बाळगता, काळजी घेत काम करत रहावे हाच सध्या कोरोनाबरोबर जगण्याचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. संसर्गाचे प्रमाण जास्त हाकोरोना विषाणूचा मुख्य गुणधर्म आहे. परंतु याची जागतिक टक्केवारी पाहिली तर ८० टक्क्यांपर्यंत लोकं असिम्प्टोमॅटीक आहेत. कोरोनाची तीन स्वरूप आहेत सौम्य, मध्यम आणि गंभीर. सौम्य स्वरूपासाठी १० दिवस सीसीसीमध्ये (कोरोना केअर सेंटर) राहून लक्षणांवर आधारित उपचार देऊन त्यांची फक्त प्रतिकारशक्ती वाढवतो. उर्वरित १५ टक्के लोकांना लक्षणे असतात. ताप, सर्दी, खोकला असतो, काही लोकांच्या तोंडाची चव जाते, काही लोकांना जेवावसं वाटत नाही. उर्वरित काही २-३ टक्के रुग्ण गंभीर असतात. आज साडेसहा लाख लोक बाधित झाले आहेत. चाचण्यांसाठी शासनाच्या २७०-७५ लॅब व खासगी ७०-७५ अशा सगळ्या मिळून ३६९ लॅबमधून २४ तासात रिपोर्ट येत आहेत. अँटीजेन टेस्ट आणि अण्टीबॉडी टेस्ट वाढवल्या आहेत. मी पुन्हा एकच सांगेन कि, गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून घेतलेले हे सगळे निर्णय आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.