पुणे,दि.१८- जिल्ह्यातील जनतेला टंचाईच्या झळा जाणवणार नाही, यासाठी क्षेत्रीय स्तरावरील अधिका-यांनी दक्ष रहावे. पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांना चारा याबाबत समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार संग्राम थोपटे,आ. सुरेख गोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राम यांनी प्रारंभी तालुकानिहाय टंचाई आढावा घेतला. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशी आहे,चारा उपलब्धतेचे प्रमाण, एमजीनरेगांतर्गत कामाची स्थिती, उपलब्धतता याची विस्तृत माहिती घेतली. उपविभागीय अधिका-यांनी दर आठवड्याला गटविकास अधिकारी,तहसिलदार आणि लोकप्रतिनिधी यांची टंचाईविषयक आढावा बैठक घ्यावी, क्षेत्रीय स्तरावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेच्या समस्या, मागण्या समजावून घ्याव्यात, त्यानुसार टँकरचे प्रस्ताव पाठवावेत. जिल्हाधिकारी स्तरावर टँकरचे प्रस्ताव तात्काळ मंजूर केले जातात, असेही ते म्हणाले. नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करुन पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटत असेल तर तसे प्रस्ताव पाठवण्यासही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. टंचाईच्या कामात दुर्लक्ष करणा-यांवर कार्यवाही केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. टंचाई निवारणासाठी शासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत, याची माहिती ग्रामपंचायत स्तरावर देण्यात यावी, असे सांगून जिल्हास्तरावर चारा उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गाळपे-याच्या भागात केवळ चारा उत्पादन केले जावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी त्यासाठी दक्ष रहावे.सर्व यंत्रणांमध्ये समन्वय रहावा, यासाठी तालुकास्तरावर टंचाई निवारण कक्ष स्थापन केल्याची माहितीही त्यांनी दिली.
खासदार आढळराव-पाटील यांनीही टंचाईनिवारणा संदर्भात उपयुक्त सूचना केल्या. यंदाची टंचाईपरिस्थिती वेगळी असून सर्वांच्या सहकार्याने यावर मात करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी मंत्री वळसे-पाटील यांनीही पाण्याचे टँकर, चाराटंचाई,पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती याबाबत सूचना केल्या. पिण्याचे पाणी, चारा आणि रोजगार हमी योजनेची कामे याबाबत स्वतंत्र नोडल ऑफीसर नेमावा, असे त्यांनी सांगितले. बैठकीस विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.