पुणे दि ०१ : -पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेनेही शहरात मॉल्स आणि शॉपिंग मार्केट उघडण्यास परवानगी दि.5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत हे मॉल्स सुरू असतील. येथील सिनेमागृह आणि रेस्टॉरंट मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढले आहेत.
या आदेशानुसार शहरातील लॉकडाऊनही दि.31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर, रात्रीची संचारबंदी रद्द करण्यात आली आहे. आता कंटेन्मेंट झोनमधील दुकाने सकाळी आणि सायंकाळी अशा दोन टप्प्यांत उघडली जाणार आहेत
तर गोल्फ, नेमबाजी, जिम्नॅस्टिक, मल्लखांब तसेच आऊटडोअर बॅटमिंटन खेळण्यास मान्यता देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांसाठी तयार केलेला पी-1 पी-2 नियम बंद करण्याबाबत या आदेशात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच दुकानांसाठी या पूर्वीचेच नियम कायम असणार आहेत.
दुचाकीवर डबल सीटला मुभा
पालिका आयुक्तांनी नव्याने काढलेल्या आदेशानुसार, आता दुचाकीवर दोघांना प्रवास करता येणार आहे. या व्यक्तींना मास्क वापरणे बंधनकारक असेल, तर चालकाला हेल्मेट सक्तीचे असेल. चारचाकीत चालकासह तीन जणांना, टॅक्सी, कॅबमध्ये चालकासह 3 जण, रिक्षात वाहकासह 2 जणांना प्रवासाला मुभा देण्यात आली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रांत 2 वेळा उघडणार दुकाने
प्रतिबंधित क्षेत्रांत सध्या अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहणार असून, त्यासाठी सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 6 अशी वेळ देण्यात आली. तर दवाखाने आणि औषध विक्रीच्या दुकानांसाठी नियमित वेळ असणार आहे.
सर्व बांधकामे सुरू राहणार
बांधकामांच्या सर्व ठिकाणे (खासगी तसेच शासकीय) ज्यांना परवानगी देण्यात आली आहे, ती सुरू राहणार आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वीच्या ज्या कामांना परवानगी दिली आहे, ती कामेही सुरूच राहणार आहेत.
यांना बंदीच…
– 65 वर्षांवरील व्यक्ती, 10 वर्षाखालील मुलांना घराबाहेर पडण्यास मनाई
– नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्र, सभागृहे
– शाळा, महाविद्यालय तसेच इतर शैक्षणिक संस्था
– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जलतरण तलाव, जीम, स्पा
– चित्रपटगृहे, हॉटेल