पुणे, दि ११: सर्व निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूकीशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमावर भर देताना मतदार जागृतीसाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना भारत निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज केल्या.
येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृहाच्या हरित इमारती मधील सभागृहात पुणे विभागाचा निवडणूक विषयीची आढावा बैठक भारत निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी पुणे विभागाचे मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे शिरीष मोहोड, उपयुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, पुण्याच्या उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मोनिका सिंग, साताऱ्याच्या उपजिल्हाधिकारी (निवडणूक) पूनम मेहता, सांगलीचे उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, कोल्हापूरच्या उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहल भोसले, सोलापूरचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सतीश धुमाळ यांच्यासह मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
या वेळी भारत निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील मतदार नोंदणी संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम 2019 अंतर्गत मतदार नोंदणी, दिव्यांग मतदार नोंदणी, तसेच ईव्हिएम मशीनच्या प्राथमिक स्तरावरील तपासणी, व त्या बाबत जनजागृती नियोजन याचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी श्री सुनील अरोरा म्हणाले, सर्व निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूकी संबंधी तसेच ईव्हिएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षण द्यावे. प्रत्येक टप्यावरील प्रशिक्षणावर विशेष भर द्यावा. मतदार जागृतीच्या कामाचे योग्य नियोजन करण्याबरोबरच मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीचा जिल्हानिहाय आढावा दिला. तसेच विभागात नवीन मतदार नोंदणीसाठी प्रत्येक मतदान केंद्रात दर रविवारी तसेच प्रत्येक मंगळवारी प्रत्येक महाविद्यालयात घेतलेल्या विशेष कॅम्पची माहिती दिली. पुणे जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणीसाठी 2 लाख 736 फॉर्म नंबर 6प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. मतदार नोंदणीसह सुरू असलेल्या सर्व निवडणूक विषयीच्या कामाचा आढावा त्यांनी यावेळी सादर केला.
यावेळी पुणे विभागातील निवडणूक उपजिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील निवडणूक विषयीचे सविस्तर सादरीकरण केले.
श्री सुनील अरोरा यांनी पुणे विभागातील निवडणूक विषयी कामाविषयी समाधान व्यक्त केले.
******