पिंपरी, दि. ३० – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील महिलांना चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. नागरवस्ती विकास योजना विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत शहरातील प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना वाहन परवान्याचे आमदार जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. पिंपळेगुरवमधील निळू फुले रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसेविका शैलजा मोरे, आरती चोंधे, माई ढोरे, माधवी राजापुरे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, “विविध क्षेत्रात महिलांना संधी दिलेल्या देशांनी प्रगती साधल्याचा इतिहास आहे. महिलांच्या हातात कारभार असणारे देश खऱ्या अर्थाने विकसित देश बनले आहेत. महिला सक्षम झाल्या, तर देश सक्षम होतो. पिंपरी चिंचवड महापालिकेनेही शहरातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. या प्रशिक्षणाचे रुपांतर रोजगारात झाले पाहिजे. सर्व क्षेत्रात शहरातील महिला सक्षम झाल्या पाहिजेत. पुरुषांबरोबर महिलांनी देखील कुटुंबाला आर्थिक हातभार लावला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.”
प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिलांना उबेर कंपनी व महापालिका यांच्यात रोजगार उपलब्ध करुन देण्या बाबतचा करार करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी यावेळी दिल.
या कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रज्ञा शहा, दिपाली जगदाळे, अर्चना भांगरे, वैशाली चोरभिसे, सोनाली देवरे, वैशाली खरात, मोनाली भालेकर, विदा जाधव, ज्योती कस्तुरे, सविता जाधव, पुनम शेगडे, मंगल बारस्कर,अर्चना वडणे, सिमा साळुंके, अंकिता जाधव, कल्पना घोलप यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. तसेच उबेर कंपनी बरोबर व्यवसाय करणाऱ्या महिला प्रमिला ढोणे, प्रीती नाईक, ललिता उशिरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.