पुणे,दि.११ :-आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने आदिवासी संस्कृतीला चालना मिळण्याच्या दृष्टीकोनातून यंदा पहिल्यांदाच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) सहभाग घेतला आहे. याद्वारे आदिवासी संस्कृतीवर आधारित लघुपटांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी पाच ते सात मिनिटांचे लघुपट बनविण्याचे आवाहन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थचे आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने विषय निश्चित केले असून या विषयांवर आधारित लघुपटांची १५ डिसेंबर २०१९ पर्यंत www.piffindia.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. १० ते १७ जानेवारी दरम्यान पुण्यात होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) हे लघुपट प्रदर्शित केले जाणार आहेत. लघुपटांसाठी संस्थेने महाराष्ट्रातील आदिवासी राजवाडे व किल्ले, महाराष्ट्रातील आदिवासींची पारंपरिक संगीतवाद्ये, महाराष्ट़ातील आदिवासींची पारंपरिक वेशभूषा संस्कृती, महाराष्ट्रातील आदिवासींमधील प्राचीन / पारंपरिक मसाले आणि वैद्यकीय आजार तसेच महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृतीतील आकर्षक / आश्चर्यकारक आधुनिकता आदी पाच विषयांची निवड केली आहे. इच्छूक आपले लघुपट हे कोणत्याही भाषेत करु शकतात मात्र त्यासाठी ‘इंग्लिश सबटायल्स’ आवश्यक असणार आहेत. मोबाईलवर चित्रित केलेल्या लघुपटांना स्पर्धेत समाविष्ट होता येणार नाही. या लघुपटांच्या स्पर्धेच्या नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याचेही संस्थेने कळविले आहे.
महाराष्ट्रातील आदिवासींची संख्या ही एक कोटींहून अधिक आहे. त्यांची संस्कृती या माध्यमातून समोर येण्याची ही खूप मोठी व चांगली संधी आहे. या स्पर्धेदरम्यान बनविण्यात आलेले लघुपट हे मुंबई व नागपूर येथील चित्रपट महोत्सवासतही प्रदर्शित करण्यात येणार आहे.