अ.नगर दि११:- :-शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात.अनेकांना साईबाबांना जवळून पाहण्याची इच्छा असते. पण दर्शनासाठी भलीमोठी भक्तांची रांग असते. हीच भलीमोठी रांग साईभक्तांच्या मनाला धडकी भरवते. नेमकी हीच गोष्ट हेरुन एका टोळीने साईभक्तांना लुटण्याचा प्लॅन आखला. व्ही.आय.पी दर्शन सोबतच भक्तनिवासात राहण्याची सोय करून देतो असे सांगून प्रत्येक साईभक्तांकडून २५०० रुपये घेतले जात होते, साईभक्तांना विश्वासात घेऊन सांगितले जात होते की, हे यंत्र साईबाबांचे आहे, या यंत्राची किंमत ५०० – १०० रूपये असून या यंत्रामुळे व्ही.आय.पी दर्शन सहजरित्या करु शकता. साईभक्तांनी एवढे पैसे देऊनही व्ही.आय.पी दर्शन होत नव्हते आणि भक्तनिवासात राहण्याची सोय होत नव्हती. शिर्डी पोलीस साध्या वेशात फिरत असताना त्यांना ही बाब लक्षात आली, आणि शिर्डी पोलिसांनी १२ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाबड्या भक्तांची लूट करणाऱ्या टोळीला शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. त्याचप्रमाणे साईच्या शिर्डीत अशा कितीतरी टोळ्या लुटण्यासाठी असतात.त्यामुळे भक्तांनी सावध राहुन अशा कोणत्याही भुलथापांना बळी न पडणे जास्त सावधगिरीचे ठरेल.