पुणे दि.०८ :- केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे व जलसंवर्धनाची जलशक्ती मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश केंद्रीय सहसचिव सुषमा ताईशेटे यांनी आज येथे दिले.जलशक्ती अभियानाबाबत मार्गदर्शनासाठी केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांच्या पथकाने आज जिल्हा प्रशासनाशी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली, त्यावेळी श्रीमती ताईशेटे बोलत होत्या. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, उपवनसंरक्षक ए.लक्ष्मी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सहसचिव ताईशेटे म्हणाल्या, जलशक्ती अभियानांतर्गत जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे. एक जुलैपासून या अभियानास देशभरात सुरुवात झाली असून पुरंदर व शिरूर या तालुक्यांतील भूजलाची स्थिती लक्षात घेता तिथे ही मोहिम राबवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.भूजलाची पातळी खालावलेल्या भागात लक्ष केंद्रित करून रेन वॉटर हार्वेस्टिंग, पारंपरिक जलस्त्रोतांचे नुतनीकरण, पुनर्वापर व वनीकरण,तसेच यासाठी अधिक लोकसहभाग मिळवण्यात येणार आहे. मोहिमेत केंद्र शासनाची विविध मंत्रालये, राज्य शासन व विविध विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा सहभाग आहे. स्वयंसेवी संस्थांचेही मोहिमेला सहकार्य घेतले जाणार आहे.दिर्घकालीन विचार करून आराखडा तयार करा असे सांगून सहसचिव ताईशेटे यांनी गावातील पाणीस्त्रोत, पीकपदधती, ठिबक सिंचनाची स्थिती, तालुकानिहाय झालेली कामे, व्हावीत अशी कामे व गरजेची कामे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली असून उद्या प्रत्यक्ष पुरंदर व शिरूर तालुक्यातील काही गावांची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले,जलसंवर्धनासाठी केंद्र व राज्य शासन मिळून हे अभियान राबविले जाणार आहे. जलसंकटावर मात करणे हा जलशक्ती अभियानाचा मुख्य हेतू आहे,जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात झालेली कामे, त्यांची सद्यस्थिती, त्यावर करावयाच्या उपाययोजना आदींवर भर दिला जाणार आहे. जलसंवर्धन आराखडा तयार करुन त्यानुसार या भागात आवश्यक कामे केली जाणार आहेत.