सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का) दि.२३ : – ४६ रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी आज जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात तसेच शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सुमारे ६८ टक्के मतदान झाल्याचा आंदाज आहे. तसेच काही मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट, बॅलेच युनिट व कंट्रोल युनिट यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने सदर यंत्रे तात्काळ बदलून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६१.११ टक्के मतदान झाले. यामध्ये २ लाख ८ हजार ९०५ पुरुष तर १ लाख ९८ हजार ५०७ महिला असे एकूण ४ लक्ष ७ हजार ४१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहाने मतदान झाल्याचे सांगून श्री. फड म्हणाले १० बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट २० तर ४२ व्हीव्ही पॅट मशिन बदलण्यात आली.
सकाळी जिल्हा परिषद मराठी शाळेत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मतदान केले. कसाल- बालमवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक १४३ येथे ७० वर्षांच्या आजी आनंदी राजाराम परब यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर कणकवली तालुक्यातील कनेडी सांगवे येथील मतदान केंद्र क्रमांक २७५ येथे ८० वर्षांच्या आजी नताली जॉकी डिसिल्वा यांनी मतदानाचा हक्क बजावला. कणकवली तालुक्यातील कलमठ मतदान केंद्र या सखी मतदान केंद्रावर सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाची प्रक्रिया पार पाडली. आज झालेल्या मतदानावेळी मतदारांसाठी मेडीकल कीट, पाळणाघर तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हील चेअर आदी सुविधा मतदान केंद्रावर उभारण्यात आल्या होत्या.