पुणे, दि. ०५ : मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री, अजित पवार यांनी केले.
मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर व तीर्थक्षेत्र विकास भूमिपूजन समारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, तहसिलदार विक्रम देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, मध्यप्रदेशचे रवी किरण साहू, सुदुंबरेच्या सरपंच मंगल गाडे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर व तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ६६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे विचार कार्य सर्व नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम शासन करत आहे.
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्यात येत आहे. त्यांचे स्मारक राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. वर्धा तालुक्यातील सेलू येथील आयटीआयचे श्री संत संताजी जगनाडे महाराज आयटीआय असे यांचे नामकरण करण्यात आले आहे. नागपूर येथे आर्ट गॅलरी त्यांच्या नावाने उभारण्याचे काम सुरू आहे.
संत महात्म्यांनी समाजाला एकता, समता आणि बंधुताची शिकवण देवून राज्य समृध्द केले आहे. संतांनी कधीही संकुचित विचार केला नाही. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे प्रबोधन केले. त्यांचे विचार हे शाश्वत आहेत, असेही त्यनी सांगितले.
यावेळी आमदार श्री. शेळके परिसरात होऊ घातलेल्या विकास कामांची माहिती दिली.