पुणे ग्रामीण,दि.०८:- दौंड तालुक्यातील पारगावजवळ असणाऱ्या रांजणगाव सांडस (ता.शिरूर) येथे एका महीलेचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता व दि. ०३ जुलै रोजी विवाहित महिलेचा रशीने गळा आवळून आणि विजेचा करंट देऊन खून करण्यात आला होता.
या घटनेमुळे पारगाव-रांजणगावमध्ये मोठी खळबळ उडाली होती. आता या खुनाचा उलगडा झाला असून फिर्यादी हा पतीच आता यातील आरोपी म्हणून समोर आला आहे.दि. 3 जुलै रोजी रांजणगाव सांडस येथे शितल स्वप्नील रणपिसे या 23 वर्षीय विवाहितेचा तीच्या राहत्या घरात रशीने गळा आवळून आणि विजेचा करंट देऊन खून करण्यात आला होता. याबाबत शितलचा पती स्वप्नील शामराव रणपिसे (वय 27) याने यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यवत पोलिसांनी शिरूर पोलिस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग केला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा अन्वेशन विभाग आणि शिरूर पोलिस यांनी या घटनेचा तपास सुरु केला असता त्यांना यात महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आणि त्यातून फिर्यादी स्वप्नील रणपिसे हाच यातील आरोपी असल्याचे आणि त्यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले.
खुनाच्या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. विवाहितेचे घर, परिसराची तपास पथकाने पाहणी करुन आसपास चौकशी केली. तसेच घरामध्ये सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याने हा प्रकार चोरीच्या उद्देशाने घडला आहे का, याचा देखील पोलिसांनी तपास केला. दरम्यान, पोलिसांनी स्वप्नील याच्याकडे चौकशी केली. उच्चशिक्षित असल्याने तो वारंवार वेगवेगळी हकिकत सांगत होता.
पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान पत्नी शितल हिचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली आरोपी स्वप्नील याने दिली. स्वप्नील हा शीतल यांच्यात सतत वाद होत होते. तो तिच्या चारीत्र्यावर नेहमी संशय घेत होता व तिच्या गत आयुष्याबाबत तिला वारंवार विचारण करत होता. यातून त्यांच्यात सतत वाद होते. त्यातूनच त्याने तीचा खून केला. आरोपी स्वप्नील रणपिसे याने बीएस्सी केमेस्ट्री, एमबीए चे शिक्षण घेतले आहे. तो संशयी स्वभावाचा असल्याने त्याने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन खून केला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता १० जुलै पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. पुढील तपास शिरुर पोलीस करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, एसडी.पी.ओ. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, तुषार पंदारे योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, संजू जाधव, सागर धुमाळ, काशिनाथ राजापूरे, अक्षय सुपे, गोपीनाथ चव्हाण, नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, प्रफुल्ल भगत, राहुल भवर, नाथा जगताप, नितेश थोरात, सचिन भोई, विनोद काळे, शिवाजी भोते यांच्या पथकाने केली.