पुणे,दि.०३:- पुणे शहरात शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत तब्बल ३ हजार ७०० रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी विशेष मोहिमेद्वारे कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे, संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या सराईत गुन्हेगारंच्या हालचालीवर लक्ष ठेवून गुन्हेगारी कमी करण्यावर भर दिला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच सराईत गुन्हेगार यांच्यावर वचक ठेवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगार चेकींग, गुन्हेगार आदान-प्रदान अशा योजना राबवण्यात येत आहेत.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील ९ गुन्हेगारी टोळ्यांमधील
६५ गुन्हेगारांवर मोक्का काद्यांतर्गत कारवाई केली आहे. तर ३ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे. यामध्ये दोन जणांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात
तर एकला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
तर ४२ गुन्हेगारांना पुणे शहर, पुणे जिल्हा व पुणे पिंपरी-चिंचवड हद्दीतुन तडीपार केले आहे.
पोलीस आयुक्तांनी पुणे शहरात दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे.
यापुढे सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे.