कर्जत, दि..०३:- तालुक्यातील चोऱ्यांसह अनुचित प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी लोकसहभागातुन तालुक्यातील अनेक गावांत तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवून गावांना सुरक्षितता प्रदान केली आहे. त्यामुळे चोऱ्या, छेडछाडीवर चांगलाच धाक बसला आहे. विशेष म्हणजे तालुक्याचे महत्वाचे गर्दीचे ठिकाण म्हणजे बसस्थानक व कुळधरण चौकात लोकसहभागातून तब्बल सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.यात कर्जत बसस्थानकात १२ तर कुळधरण चौकात ४ कमेऱ्यांचा सामावेश आहे.
कर्जतच्या विद्यालयात-महाविद्यालयात तालुक्यातील विविध गावांमधून हजारो विद्यार्थीनी बसमधून दररोज ये-जा करतात.या सार्वजनिक ठिकाणी अनेकवेळा मुलींची छेडछाड करून त्यांना त्रास देण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत.अशावेळी कर्जत पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत अनेक टवाळखोरांना चोप देत प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेलची हवा दाखवली आहे.कर्जतच्या बसस्थानकात नागरिकांचीही मोठी रेलचेल असते अशावेळी बसमध्ये चढताना-उतरताना पैशांच्या पाकिटाची, पिशव्यांची,वाहनांची, मोबाईलची तसेच दागिन्यांची चोरी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते.अशावेळी कर्जत पोलिसांनी आत्तापर्यंत अनेक चोरटे जेरबंद केले आहेत.मात्र अनेकवेळा लहान मोठ्या गुन्ह्यांमध्ये नागरिकांना पुराव्याअभावी न्याय मिळत नाही.तसेच तपासात मोठी अडचण निर्माण होते परंतु असे अनुचित प्रकार घडूच नयेत व मुली व महिलांची छेडछाड होऊ नये,चोऱ्या,लूटमार अशा प्रकारांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.सध्या हे केमेरे या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर व चोरट्यांवर लक्ष ठेवून असल्यामुळे अनेकांना धास्ती बसली आहे.सध्या येथे होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा बसला असून मुली व महिलांना सुरक्षितता निर्माण झाली आहे.पोलीस निरीक्षक यादव यांनी राबवलेल्या या सकारात्मक उपक्रमाचे तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
सदर कॅमेरे बसवण्यासाठी शिवाजी थोरात राहणार कोळवडी, प्रवीण फलके राहणार कर्जत, दादासाहेब थोरात राहणार थेरवडी, तालुका कर्जत यांनी आर्थिक योगदान दिले तर वाय जी इन्फोटेक चे योगेश गांगर्डे राहणार कोंभळी यांनी कुळधरण चौक येथील कॅमेरे बसविले आणि शिवाजी देशमुख राहणार आळसुंदे यांनी बस स्थानक येथील कॅमेरे बसवले तसेच स्वतःही बस स्थानकातील कॅमेऱ्याच्या कामासाठी खर्च केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान मनोज लातूरकर, बाळासाहेब यादव, दीपक कोल्हे एस टी चे संजय खराडे यांनी करून घेतली आहे.