पुणे,दि.२७:- कोथरुड येथे वडीलोपार्जित चार एकर चार गुंठे जागेवर 10 हजार चौरस फुट जागेवर असलेले पत्राशेड अनधिकृत असल्याचे सांगून शेडवर पुणे महापालिकेची कारवाई नको असेल तर आठ लाख रुपये द्या म्हणत खंडणी मागितली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI (ए) पक्षाच्या महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगण्यात येते आहे.पूजा काळु तायड (वय-45 रा. वृंदावन कॉलनी, कोथरुड) आणि निलेश शंकर वाघमारे (वय-35 रा. सागर कॉलनी, कोथरुड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत नितीन शिंदे (वय-32 रा. भुजबळ टाऊनशिप, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोथरुड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या तीन चुलत्यांची शिंदे फार्म कोथरुड येथे वडीलोपार्जित चार एकर चार गुंठे जमीन आहे. आरोपी पुजा आणि निलेश यांनी संगनमत करुन फिर्यादी नितीन शिंदे यांच्या वडीलांच्या नावावर असलेल्या मालकीच्या 10 हजार चौरस फुट जागेवर असलेले पत्राशेड अनधिकृत असल्याबाबत पुणे पालिकेकडे अर्ज केला होता.
पुणे पालिकेकडे केलेला अर्ज मागे घेण्यासाठी व शेडवर कारवाई न करण्यासाठी आरोपी फिर्यादी यांना भेटले.
तसेच पुजा तायड यांनी स्वत:ची ओळख आरपीआय (ए) पक्षाची कार्यकर्ती तसेच पुणे शहर व जिल्हा महिला आघाडीची अध्यक्ष असल्याचे सांगितले.
पालिकेची शेडवर कारवाई नको असेल तर चौघांनी आठ लाख रुपये द्या असे म्हणत खंडणीची मागणी केली.
तसेच दोन दिवसांत पैसे दिले नाहीतर येत्या चार-पाच दिवसात कारवाई करण्यास भाग पाडेन अशी धमकी दिली.
तडजोडी अंती पाच लाख रुपयांची मागणी केल्याने गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.