पुणे दि.२४- कोणत्याही गावाच्या गावठाणापासून २०० मीटरच्या परिघातील आणि अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये विकासयोग्य झोनकरीता वाटप केलेल्या क्षेत्रातील कोणतीही जमीन देय रक्कम शासनजमा करून जमीन अकृषिक करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.गावठाणापासून २०० मीटर क्षेत्रातील अशी जमीन त्या क्षेत्राला लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमांच्या अधीन राहून निवासी प्रयोजनासाठी अकृषिक वापरात रुपांतरीत केली असल्याचे मानण्यात येणार आह आणि ही जमीन रहिवासी प्रयोजनासाठी घोषित करण्यात येईल.जमीन भोगवटादार वर्ग-२ धारणाधिकाराची असल्यास अशा जमिनीच्या मानीय अकृषिक रूपांतरणापोटी देय नजराणा किंवा अधिमूल्य आणि इतर शासकीय देणी भरून सदरची जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील तरतूदीनुसार अकृषिक वापरात रूपांतरीत झाल्याचे समजण्यात येणार आहे.आवश्यक रक्कम जमा केल्यानंतर जमीन अकृषिक करण्याची प्रक्रीया करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुविेधसाठी ही प्रक्रीया मोहिमस्तरावर राबविण्यात येणार असल्याने नागरिकांना या क्षेत्रात घर बांधणे किंवा इतर प्रयोजनासाठी नियमानुसार जमीनीचा उपयोग करणे शक्य होणार आहे. जमीन अकृषिक करण्यासाठी इतर कागदपत्रांच्या पुर्तता करण्याचीदेखील आवश्यकता असणार नाही.भोगवटादाराने रक्कम भरल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या कालावधीत विहीत केलेल्या नमुन्यात सनद देण्यात येईल व त्यानुसार सदरची जमीन अकृषिक झाल्याचे समजण्यात येईल. या योजनेचा लाभ अधिकाधिक जमिनधारकांनी आणि मिळकतधारकांनी घ्यावा आणि तहसिलदारांकडे अर्ज करून जमीन अकृषिक करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.