पुणे,दि.३० :- पुण्यात व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याच्या प्रत्नात असलेल्या पाच जणांना डेक्कन पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल ५ कोटी २८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.२९) सायंकाळी सहाच्या सुमारास फर्ग्युसन कॉलेज बस स्टॉपच्या मागील बाजूस करण्यात आली.राजेंद्र राकेश कोरडे (वय –२८, रा. मु.पो. अंजर्ले, ता. दापोली, जि. रत्नागिरी), नवाज अब्दुला कुरुपकर (वय – २४), अजिम महमुद काजी (वय – ५० दोघे रा. मु.पो. अडखळ, जईकर मोहल्ला, अंजर्ले, ता. दापोली), विजय विठ्ठल ठाणगे (वय ५६), अक्षय विजय ठणगे (वय –२६ दोघे रा. चैतन्यनगर, धनकवडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. व डेक्कन पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डेक्कन पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांना माहिती मिळाली की, डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्हेल माशाची कोट्यवधी रुपयांची उलटीची तस्करी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पथक आरोपींचा शोध घेत असताना फर्ग्युसन कॉलेज बस स्टॉपच्या मागील बाजूस तीन जण संशयास्पद उभे असल्याचे दिसले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची
तपासणी केली असता, व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा आढळून आला. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती दिली. तसेच त्यांना मदत करण्यासाठी दोन जण आल्याचे सांगितले. पोलिसांनी विजय ठाणगे आणि अक्षय ठाणगे या दोघांना ताब्यात घेतले.आरोपी राजेंद्र कोरडे याच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये २ किलो ९९४ ग्रॅम वजनाचा व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा आढळला. याची किंमत २ कोटी ९९ लाख ४० हजार रुपये आहे, तर नवाज कुरुपकर याच्या बॅगेतून २ कोटी २८ लाख ६० हजार रुपये किमतीचा २ किलो २८६ ग्रॅम वजनाचा व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा जप्त करण्यात आला. तसेच विजय ठणगे याच्या ताब्यातून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी ५ कोटी २८ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे,परिमंडळ -1 पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवे करयांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे,
सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ता शिंदे, पोलीस अंमलदार महेंद्र बोरसे, स्मिता पवार, सचिन गायकवाड,
विनय बडगे, स्वालेहा शेख, बाळासाहेब भांगले यांच्या पथकाने केली.