पुणे,दि..१०:–राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि पुणे या जिल्ह्यात चक्रीवादळ, अतिवृष्टी, पुरपरिस्थिती आणि भूस्खलनामुळे झालेल्या जिवीत व वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती प्रवण ६ जिल्ह्यात २०० होमगार्डना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
भविष्यात आपत्तीची परिस्थिती उद्भवल्यास होमगार्ड आणि नागरी संरक्षण दल प्रशिक्षित आणि सज्ज असणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस महासंचालक तथा महासमादेशक होमगार्ड डॉ.बी.के.उपाध्याय आणि अपर पोलीस महासंचालक तथा उपमहासमादेशक होमगार्ड ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली २० मे पर्यंत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचेशी समन्वय ठेवून संबधित जिल्ह्याच्या होमगार्ड कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे वेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अन्य प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे होमगार्ड उपमहासमादेशक ब्रिजेश सिंह यांनी कळविले आहे.