पुणे,दि.०८ :-यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची थीम गीतकार साहीर लुधियानवी, सत्यजित रे आणि पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर आधारित असून विविध उपक्रमांचे या अंतर्गत आयोजन करण्यात आले आहे. अशाच साहिर लुधियानवी यांच्या गीतांवर आधारित ‘साहिर’ या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घेतला. ओम भूतकर दिग्दर्शित या कार्यक्रमात साहिर लुधियानवी यांच्या रचना सादर केल्या. रविवारी राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. यावेळी पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल, पीफ आयोजन समितीचे सतीश आळेकर उपस्थित होते.
‘जाने वो कैसे लोग थे जिनके’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. नचिकेत देवस्थळी यांनी हे गीत सादर केले. त्यानंतर मुक्ता जोशी यांनी ‘कभी खूद पे तो कभी हालात पे रोना आया’ हे गीत सादर केले. यानंतर नचिकेत देवस्थळी यांनी ‘जश्ने गालिब’ ही गजल सादर केली. यानंतर ओम भूतकर यांनी ‘ताजमहाल’ ही कविता सादर केली. ‘ये महलो ये तख्तो ये ताजो की दुनिया’ ही रचना जयदीप वैद्य यांनी गायली. ‘न तो कारवाँ की तलाश है’ ही कविता सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली. सलग एक तासाच्या या कार्यक्रमात साहिर लुधियानवी यांची गीते, कविता आणि नज्म सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
अभिनेता ओम भूतकर, अभिनेता नचिकेत देवस्थळी यांच्यासह गायिका मुक्ता जोशी, गायक जयदीप वैद्य, गायक अभिजीत ढेरे यांनी यावेळी रचना सादर केल्या. तसेच देवेंद्र भोमे (संवादिनी), केतन पवार (तबला), मंदार बगाडे (ढोलकी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रम व्यवस्थापन कुशल खोत यांचे होते.