डोंबिवली,दि.२७ :- सरकारी व खाजगी कार्यालयांमध्ये काम करणारे बहुतांशी नोकरदार आपल्या खासगी वाहनांमध्ये दर्शनी भागात आपण काम करत असलेल्या आस्थापना, कार्यालयांच्या नावाच्या नामा पट्ट्या लावतात. अशा सर्व वाहन चालक आणि यांच्यावर डोंबिवली, कल्याण वाहतूक विभागाने कारवाई सुरू केली आहे.
मागील दोन दिवसांत डोंबिवली, कल्याणमध्ये केलेल्या कारवाईत एकूण १७० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवली, कल्याण, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ डॉक्टर वास आंबेडकर परिसरातील बहुतांशी नोकरदार मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात नोकरी-व्यवसायासाठी जातो. नोकरदार वर्ग प्रवास करताना आपल्या खासगी वाहनाच्या दर्शनी भागात आपण काम करीत असलेल्या भारत सरकार, महाराष्ट्र शासन, आर्मी, महापालिका, प्रेस, फायर ब्रिगेड, पोलीस, प्रतिष्ठित कंपन्यांची नावे अशा आस्थापनांच्या नावाच्या पट्ट्या लावून प्रवास करतात. हे प्रवासी प्रवास करताना आपण अती महत्त्वाची व्यक्ती आहोत अशा अविर्भावात प्रवास करतात.
म्हणून लावतात नामपट्टी!
शिळ फाटा रस्ता, भिवंडी बाह्यवळण रस्ता, नवी मुंबई महापे रस्ता या भागातील रस्त्यावरून जाताना वाहन कोंडी असली तर आपणास झटपट पुढे जाता यावे, आपणास कुणी अडवू नये, असा या नोकरदारांचा वाहनापुढे नाम पट्टी लावण्याचा उद्देश असतो, असे वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दीड वर्षापूर्वी शासनाने वाहनांवर आपल्या कार्यालयाच्या, आस्थापनांच्या नाम पट्ट्या लावू नयेत. ती बेकायदेशीर असल्याचा अध्यादेश काढला आहे. वाहतूक विभागाकडून त्याची वेळोवेळी अंमलबजावणी केली जाते. शुक्रवार, शनिवार कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, डोंबिवली वाहतूक विभागाचे उमेश गीते यांनी आपल्या वाहतूक क्षेत्रात वाहनांवर नाम पट्ट्या लावणाऱ्या नोकरदार, प्रवाशांवर कारवाई केली.
..जर नामपट्ट्या आढळल्या तर कारवाई!
कारवाई करण्यात आलेल्या बहुतांशी वाहनांवर भारत सरकार, महाराष्ट्र शासन, पोलीस, आर्मी अशा नाम पट्ट्या आढळून आल्या. या सर्व वाहन चालकांवर, ती पट्टी लावण्यास जबाबदार असणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे, असे तरडे यांनी सांगितले. ही कारवाई यापुढे अधिक जोमाने केली जाईल, असे वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.