वनाथी श्रीनिवासन : ‘ जीईएम ‘ प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्राचे वितरण
पुणे , ता . २६ : -“ महिलांचा आर्थिक विकास झाल्यावर कुटुंबाबरोबर देशाचाही विकास होतो , हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार घेऊन महिला आघाडी कार्यरत आहे . महिलांच्या आर्थिक विकासासाठी कटिबद्ध आहोत , ” असे प्रतिपादन भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन यांनी केले . आघाडीच्यावतीने ‘ जीईएम ‘ ( गव्हर्नमेंट ई – मार्केटप्लेस ) अंतर्गत देशभरात महिलांसाठी कौशल्याधारि व्यवसाय प्रशिक्षण आणि नोंदणीची कार्यशाळा घेण्यात येणार आहे . यातील पहिली कार्यशाळा पुण्यात दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेत अब्दुल कलाम मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क येथे झाली . कार्यशाळेत सहभागी महिलांना अध्यक्षा श्रीनिवासन यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले . कार्यशाळेत आंध्र प्रदेश , कर्नाटक , तेलंगणा , गोवा , केरळ येथील प्रमुख पदाधिकारी ,सहभागी झाले होते . उपक्रमाच्या प्रमुख सुखप्रीत कौर , राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी , महाराष्ट्र प्रभारी ज्योतीबेन पंड्या , ज्येष्ठ नेत्या कांता नलावडे , महिला आघाडीच्या प्रांताध्यक्षा उमा खापरे , जगदीश मुळीक, महिला सक्षमीकरण केंद्राचा पुणे शहराच्या उपाध्यक्षा सौ संगीता ताई राजगुरू व पाषाण विभागातून निलिमा काळे, या कार्यक्रमास अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या.श्रीनिवासन म्हणाल्या , ” पंतप्रधान मोदी यांच्या कल्पनेतून गव्हर्नमेंट ई – मार्केटप्लेस प्रणाली सुरू झाली . विविध शासकीय विभागांना कोणतीही वस्तू या प्रणालीतून खरेदी करणे बंधनकारक आहे . या प्रणालीत नोंदणी केलेल्या महिलांना त्याचा फायदा होणार आहे . ”