पुणे दि २१ :- संपुर्ण जग कोरोना पासुन सावरण्याच्या तयारीत असताना पुनश्च: कोरोना व्हायरस चा नवा विषाणु दरवाजे ठोठावत आहे. सध्या कोरोना मुळे रुग्ण संख्या वाढत असली तरी लसीकरणामुळे कोरोनावर मात करणे शकय झाले आहे. शासनाने कोरोना विरोधात कंबर कसली असुन लसीकरणासाठी जय़यत तयारी झाली मोठया प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. शासनाकडुन देण्यात येणारी लस ही संपुर्णपणे सुरक्षित असुन लसीकरणाचे फायदे दिसुन येत आहेत.
दरम्यान, रुग्ण संख्या वाढीमुळे पुनश्च: पर्यटक साशंक झाले आहेत. तथापि, सदर बाबत कोणतीही शंका मनात गृहीत न धरता योग्य ती खबरदारी घेवुन पर्यटन करण्यास, निसर्गाचा आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाची पुणे विभागातील सर्व पर्यटक निवासे सुरु असुन कोरोनामुळे सर्व आवश्यक असलेली खबरदारी घेवुन पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहेत.
कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. जवळपास सर्वच पर्यटक निवासातील कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण सुरु झाले असुन आजअखेर एकही कोरोना बाधीत महामंडळाच्या पर्यटक निवासात निदर्शनास आलेला नाही.
पर्यटक निवासे आणि उपहारगृहे यांचे नव्याने निर्जंतुकिरण करण्यात आले आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्याबरोबरच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपटटी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली होती. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, दि. 27 ते 29 आणि दि. 2 ते 4 अशा सलग आलेल्या सुटटयांमुळे पर्यटक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचारी पर्यटनाच्या मुडमध्ये आहेत. तथापि, कोरोनाची परिस्थिती आणि कामाचा ताण यांमुळे पर्यटक सध्या कमी प्रमाणात बाहेत पडत आहेत. सदरच्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अभिनव संकल्पना आणली आहे.
‘एमटीडीसी तर्फे वर्क फ्रॉम नेचर’ ची सुविधा
मोफत वायफाय झोन ; निसर्गाच्या सानिध्यात करता येणार ऑनलाईन काम…
निसर्गरम्य असलेल्या महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये सध्या कोरोना बाबतची सर्व खबरदारी घेवुन डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट यांना बहर आला आहे. एम. टी. डी. सी. ची सर्वच पर्यटक निवासे ही मनोहारी समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगर रांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सदरच्या ठिकाणी डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण कायमस्वरुपी यादगार करण्यासाठी एम. टी. डी. सी. च्या निसर्गरम्य पर्यटक निवास आणि परिसरात येत आहेत. महामंडळानेही अशा हौशी पर्यटकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि “वर्क फ्रॉम नेचर” यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येणार असल्याने पर्यटकांमध्ये उत्साही वातावरण आहे.
“वर्क फ्रॉम नेचर” आणि “वर्क विथ नेचर”
वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे आयटी आणि इतरही कंपन्यांकडुन नव्याने “वर्क फ्रॉम होम” जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना आणि खाश्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेत काम करता यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी ) पर्यटनस्थ्ळावरील रिसॉर्टमध्ये मोफत वायफाय झोन सुविधा दिली आहे. त्यानुसार ‘वर्क फ्रॉम होम’ च्या धर्तीवर “वर्क फ्रॉम नेचर” आणि “वर्क विथ नेचर” अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पर्यटनस्थ्ळावरून काम करीत पर्यटनाचा आनंद व्दिगुणित करीत आहेत. टप्प्याटप्प्याने राज्याभरातील ‘एमटीडीसी’ च्या सर्व रिसॉर्टवर अशी सुविधा होणार आहे.
कार्यालयातील कर्मचारी वर्गालाही एकाच वातावरणात सतत काम करून मानसिक थकवा येतो. त्यांच्या क्रयशक्तीवरही परिणाम होतो. नोकरदारवर्गाची जशी अडचण होते तशीच अडचण विविध प्रकल्पांवर काम करणारे अधिकारी, गुंतवणूकदार किंवा व्यापारी, उदयोजकांचीही होते. अशा सर्वच घटकांना निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत कामही करता यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टवर वायफाय झोन ची सुविधा दिली आहे.
चार-पाच दिवसांची सुटी घेत रिसॉर्टवर जाउन ठराविक वेळेत काम व उर्वरित वेळेत पर्यटनाचा आनंद घेणे शक्य आहे. या सुविधेमुळे कामात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. याशिवाय रोज त्याच त्या ठिकाणी बसून काम करण्याचा आलेला कंटाळा घालवून निसर्गाच्या सानिध्यात राहून चांगले काम करता येणे शक्य होणार आहे.
“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) राज्यातील विविध रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली आहे. यात पर्यटन झोनवरील सुविधा मोफत आहेत, तर एखादया पर्यटकाला त्याने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही अशी सुविधा देण्यात येईल. अशी सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे झाली आहे. यापुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा होईल. तथापि, पर्यटकांना कोरोना ची धास्ती न घेता महामंडळाच्या पर्यटक निवासात यावे. या ठिकाणी पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोना बाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसुन येईल. त्यामुळे निसर्गाचे भान ठेवुन आणि कोरोना बाबत दक्षता घेवुन बिनधास्त पर्यटन करावे.
-दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे’.