मुंबई, दि. २२ जीवनावश्यक घटकांमध्ये भेसळ करणा-यांना यापुढे जन्मठेपेची कारवाई होणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय़ घेतला असल्याची माहिती मंत्री गिरीश बापट यांनी आज विधान मंडळात दिली.या संदर्भात विधेयक आज विधान सभेत मंजूर झाले . उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातदेखील अशा शिक्षेची तरतूद करण्यात आल्याचे बापट यांनी सांगतिले कलम 272 ते 273 मधील तरतूदी अन्न पदार्थांशी निगडीत असून कलम 274 ते 276 मधील तरतूदी या औषधाशी निगडीत आहेत. ही कलमे अजामिनपात्र स्वरुपाची असून यामध्ये 6 महिन्यापर्यंत कैद आणि एक हजार रुपये दंडाची तरतूद होती, ही शिक्षा अन्न व औषधामधील भेसळ रोखण्यासाठी अत्यंत तोकडी असल्यामुळे त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. नवा कायदा संमत झाल्यास जन्मठेपेची कारवाई करता येणार आहे. या संदर्भात विधी आयोगाने केंद्रीयमंत्री, विधी व न्याय विभागाकडे शिफारस केली आहे.
बापट पुढे म्हणाले, स्वामी अच्युतानंद तीर्थ व इतर विरुध्द केंद्र शासन या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार वरील कलमात बदल करण्यात आला असून पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व ओडिशा या राज्यात या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील या शिक्षेची तरतूद करण्यात यावी, यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला आहे. विक्रीसाठी ठेवायच्या खाद्यपदार्थात ते अपायकारक होईल अशाप्रकारची भेसळ करणे यापुढे जन्मठेपेसाठी कारणीभूत ठरणार आहे.