पुणे दि ०१ :- डिजिटल सातबारा उतारा व जमिनीचा खाते उतारासुध्दा (गाव नमुना नं. 8 अ ) डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमि अभिलेख विभागाने घेतला आहे. महसूल दिनापासून (१ ऑगस्ट) ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. व भूमि अभिलेख विभागाकडून विविध सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.अधिकाधिक सुविधा ऑनलाईन मिळाल्यास नागरिकांना तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही. घरबसल्यासुध्दा नागरिकांना सुविधा मिळायला पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. त्याचा एक भाग म्हणून डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उताऱ्या पाठोपाठ खाते उताराही ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप म्हणाले की, “ई-फेरफार कार्यक्रमा अंतर्गत डिजीटल स्वाक्षरीत खाते उतारा (गाव नमुना नं. ८-अ ) आता ही आणखी एक नवीन सुविधा शनिवारपासून (ता.१) सुरू केली जात आहे. या योजेनेचा शुभारंभ महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होत आहे. महाभूमी पोर्टलवर संगणकीकृत अभिलेखापैकी फक्त सातबारा डिजिटल स्वाक्षरीत जनतेला डाऊनलोडसाठी उपलब्ध होता.
आता त्यासोबतच डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा देखील मिळणार आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंवा जमीन खरेदी विक्रीसाठी सातबारा उतारा सोबतच खाते उतारा देखील आवश्यक असतो. त्यामुळे महसूल विभागाने खाते उतारा देखील तलाठी यांचे डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.