पुणे दि०३ : -“जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषणाचा विळखा घट्ट होत असताना त्याला सामोरे जाण्यासाठी स्वच्छ, निरोगी वायू देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करणे खूप गरजेचे आहे. या देशी वृक्षांपासून आपल्याला शुद्ध हवा, सुंदर फुले आणि मधुर फळे मिळतात. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वाढदिवस किंवा इतर आनंदाच्या क्षणाचे निमित्त साधत एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे,” असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते आणि सह्य़ाद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित ट्रिनिटी अकॅडेमी ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. आंबा, चिंच, आवळा, पेरू आदी देशी वृक्षांची रोपे लावण्यात आली. त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात देशी वृक्षांची देवराई साकारलेली पाहायला मिळाली. प्रसंगी केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, सयाजी शिंदे यांचे महेश नामपूरकर, ट्रिनिटी अकॅडेमीचे प्राचार्य डॉ. निलेश उके, स्थापत्य विभाग प्रमुख डॉ. सतीश देशमुख,ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका प्रीती सांगवान आणि राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक सचिन कुदळे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीमोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सयाजी शिंदे यांनी ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थींनीशी संवाद साधला. प्रसंगी त्यांनी कवी अरविंद जगताप यांची झाडांचे महत्व सांगणारी कविता स्वतःसह उपस्थिताकडून म्हणवून घेतली. कल्याण जाधव यांनी संस्थेच्या ११० एकर जागेत किमान एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याचे सांगितले.