नीरा नरशिहपु. दि .१७ :-ज्या विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड आहे आणि त्यात करिअर करावे, असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी औषधनिर्माणशास्त्र हा यशस्वी पर्याय ठरू शकतो. असे मत जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांनी व्यक्त केले. विद्यानिकेतन फार्मसी कॉलेजमधील डी फार्म व बी फार्म कॉलेजच्या प्रवेश उत्सवा निमित्त श्रीमंत ढोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना श्रीमंत ढोले म्हणाले की, जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या विद्यानिकेतन शाळेच्या मार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी अनेक सोयी-सुविधा व उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात. स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. उच्च गुणवंत प्राप्त विद्यार्थी या शाळेतून घडविण्याचे काम येथील प्रत्येक शिक्षक करीत असतो त्यामुळे अल्पावधीतच शाळेने उत्तुंग भरारी घेतली आहे. विद्यानिकेतन फार्मसी कॉलेज मधील विद्यार्थी भविष्यातला देवदूत आहे असे म्हणले तरी काही वावगे ठरणार नाही कारण रुग्णांना जीवनदान मिळण्यात मोठा वाटा हा औषधांचा असतो. वैद्यकशास्त्र हे रोगाचे निदान करायला शिकवते तर औषधनिर्माणशास्त्र त्या रोगावर कोणते औषध वापराव, ते कसे तयार करावे हे शिकवते. फार्मसी केल्यानंतर फक्त औषधांचे दुकान टाकणार हेच काही काळापूर्वी लोकांना वाटत होते; परंतु सध्या फार्मासिस्ट हा फक्त रिटेल किंवा होलसेल फार्मासिस्ट न बनता, कम्युनिटी फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट, इंडस्ट्रियल फार्मासिस्ट होऊ शकतो तसेच देशांतर्गत संधीशिवाय परदेशातही जसे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर, कॅनडा, जपान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, मलेशिया व इतर अनेक देशांच्या फार्मसी क्षेत्रात यशाच्या शिखरांवर पोहोचण्यासाठी मुबलक संधी उपलब्ध आहेत.असेही यावेळी श्रीमंत ढोले यांनी सांगितले. यावेळी पुणे येथील मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य शशिकांत ढोले यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी या कार्यक्रमास जीएसटी कमिशनर प्रकाश शेळके, बारामती विभागाचे प्रांताधिकारी हेमंत निकम, महाराष्ट्र राज्याच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे सचिव दिलीप ढोले, राज्यकर उपायुक्त सुजाता ढोले, प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव, संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, प्राचार्य बालाजी मोटे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नितीन मोहीर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी