पुणे दि, १६ :- पुणे शहरात कचरा गोळा करणाऱ्या कुटुंबातील ९ वर्षाची मुलगी हरविली.होती पण या देशात अजूनही जिव्हाळा, ममत्व शिल्लक असल्याने कचरा वेचणाऱ्या महिलेनेच तिचा रात्रभर सांभाळ केला.व दुसऱ्या दिवशी भंगार विकत घेणाऱ्या दुकानात घेऊन आल्या. तेथे कोंढवा पोलीस तिचा शोध घेत पोहचल्याने या मुलीला पालकांच्या स्वाधीन करता आले.
सुरेखा मोतीराम लोणके (रा़ काकडे वस्ती, कोंढवा) यांच्याकडे त्यांची बहिणीची ९ वर्षाची मुलगी पल्लवी रहायला आली आहे. त्या कचरा गोळा करण्याचे काम करतात. १४ एप्रिलला एका सोसायटीत कचरा गोळा करायला गेल्यावर पल्लवी त्यांची नजर चुकवून सोसायटीतून बाहेर गेली व चुकली. लोणके यांनी कोंढवा पोलसांकडे तक्रार दिली. पण पल्लवीचा कोणताच फोटो त्यांच्याकडे नव्हता. त्या मोबाईलही वापर नसल्याने केवळ वर्णनावरुन या मुलीचा शोध सुरु झाला.
सोमवारी पोलिसांनी भंगाराच्या दुकानावर जाऊन कचरा वेचणाऱ्या महिलांकडे तपास केल्यावर त्यांना या महिला कचरा गोळा करीत असताना त्यांच्या पाठीमागे एक लहान मुलगी आलेली होती. तिच्याकडे त्यांनी चौकशी केल्यावर ही मुलगी चुकून त्यांच्या पाठीमागे आल्याने ती खूप घाबरलेली होती. तिला तिचा पत्ताही सांगता येत नव्हता. त्यांनी रात्रभर तिचा सांभाळ करुन ही मुलगी भंगार गोळा करणाऱ्या कोणाची तरी असावी म्हणून ते सकाळी दुकानावर घेऊन आले होते. मुलीची खात्री करुन तिला ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे, पोलीस नाईक अमित साळुंखे, सुरेंद्र कोळे, कळसाईत, पोलीस शिपाई बलसुरे यांनी केली.