पुणे दि १८ : –पुणे शहरात आणि विविध गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यांमध्ये मुळ मालकांच्या अनास्थेमुळे तसाच पडून राहतो . त्यात दुचाकींनी तर पोलीस ठाण्यांचे आवार गच्च भरलेले असतात . मुळ मालकांना कामाच्या व्यस्ततेमुळे येणे अशक्य होते . न्यायालयीन प्रक्रियेचाही कंटाळा केला जातो . परंतु फरासखाना पोलीस ठाण्याने पुढाकार घेत जप्त केलेल्या दुचाकीच्या मुळ मालकांशी संपर्क साधण्यात आला . त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करून ३० दुचाकी मुळ मालकांना परत करण्यात आल्या . शहरात प्रथमच अशा प्रकारे फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला .
शहरातील पोलीसांकडून गुन्ह्यांची उकल केल्यानंतर त्यातील मुद्देमाल जप्त केला जातो . त्यानंतर तो मुद्देमाल घेण्यासाठी मालक पोलीस ठाण्यात येत नाहीत . लहान मुद्देमाल नेला जात नाही . परंतु जप्त केलेल्या दुचाकींनीही पोलीस ठाण्यांचे आवार तर गच्च भरलेले असते . त्यात फरासखाना पोलीस ठाणे हे शहरातील मध्यवर्ती परिसरात आहे . परंतु त्याला जागा अपुरी आहे . त्यामुळे पोलीस ठाण्याचे आवार अशा जप्त दुचाकींनी खचाखच भरलेले आहे . तसेच वर्षानुवर्षे त्या पडून राहिल्याने उन, वारा, पाऊस यामुळे खराबही होत होत्या.
या सर्व गोष्टींचा विचार करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकींच्या मुळ मालकांशी संपर्क साधला . आणि दुचाकी न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करून घेऊन जाण्याबाबत सांगितले . मात्र या दुचाकींचे मुळ मालक हे वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यास आणि कामास आहेत . त्यामुळे त्यांना कामाच्या व्यापातून न्यायालयात प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी हजर राहणे अशक्य होत होते . त्यामुळे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी जप्त मुद्देमालाची यादी करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्र. २ यांच्याशी पत्रव्यवहार करून फिर्यादींना तो मुद्देमाल घेऊन जाण्यासंदर्भातील व ठेवण्यासंदर्भातील अडचणींची सविस्तर चर्चा केली . त्याआधारे न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करत मुद्देमालाच्या मुळ मालकाची खात्री करून त्याचा पंचनामा करावा आणि तो मुळ मालकाला परत कारावा . तसेच त्याचा अहवाल न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात करावा असा आदेश दिला.
न्यायालयाच्या आदेशाने फरासखाना पोलिसांनी एकूण ३० दुचाकी मालकांशी संपर्क साधून त्यांना गाड्या परत दिल्या. पोलिसांच्या पुढाकाराने प्रथमच अशा प्रकारे मुळ मालकांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे.
यासाठी परिमंडल १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे , सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे , पोलीस हवालदार संजय क्षीरसागर , नागेश राख , महिला कर्मचारी आशाराणी कांबळे यांनी प्रयत्न केले.