पुणे ग्रामीण,दि.२०:-पुणे शहरातील अनधिकृत पब, बार अँड रेस्टॉरंट नंतरुन आता पुणे ग्रामीणमध्ये अनधिकृत पब, बार अँड रेस्टॉरंटवर ‘पीएमआरडीए’ने धडक कारवाई सुरू केली आहे. पिरंगुट (ता. मुळशी) परिसरातील दि.१८ रोजी सायबा बार, सोनाली रेस्टो बार, जिप्सी रेस्टो बार, अथर्व रेस्टो बार आदी चार अनधिकृत हॉटेल, पब, बार अँड रेस्टॉरंटवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे कारवाई करून बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत सुमारे २१ हजार १२४ चौरस फूट क्षेत्रावरील बांधकाम पाडण्यात आले.
‘पीएमआरडीए’ने भूगाव व भुकूम भागातील ड्रंक इन लेक, सँडल वूड, बनियार्ड ब्रिस्ट्रो, राजहंस रेस्टो अँड बार, टी टू बार, टॅप्स अँड टॉक्स अशा एकूण सहा अनधिकृत हॉटेल, पब, बार अँड रेस्टॉरंटची बांधकामे पाडण्यात आली.
या कारवाईत सुमारे २८ हजार ५५५ चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पोकलेन, जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे, सहाय्यक आयुक्त दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार मनीषा तेलभाते व बजरंग चौगुले, अभियंता सुनील पोवार, अन्य अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कोणीही अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन ‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातील अधिकाऱ्यांच्या वतीने या वेळी करण्यात आले.