पुणे, दि.१५ : -राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभाग भरारी पथकाने केलेल्या कारवाईत नीरा गावच्या (ता. पुरंदर) हद्दीत १३ लाख ८२ हजार ४०० रूपये किंमतीच्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण २१ लाख ६९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नीरा- लोणंद मार्गावर नीरा येथील पालखीतळाजवळ वाहनांच्या तपासणीदरम्यान अशोक लेलॅण्ड कंपनीचे बडा दोस्त मॉडेलच्या चारचाकी टेम्पो वाहन क्र. एमएच ०३- सीव्ही ९४६८ मध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १८० मि.ली. क्षमतेच्या ७ हजार ६८० बाटल्या असलेले १६० खोके जप्त करण्यात आले. वाहनातील इसमांकडे मद्य वाहतुकीसंदर्भातील कोणतेही परवानगीपत्र, परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.
जप्त वाहनासोबत असलेल्या जुलवा जि.सुरत आणि दहिसर पूर्वच्या दोन इसमांना अटक करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्ही. एम. माने आदींनी सहभाग घेतला असून पुढील तपास ए. बी. पाटील करत आहेत, अशी माहिती भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक श्री. पाटील यांनी दिली आहे.