.पुणे, दि.२५-: अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास आणि उन्नतीसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. २४ फेब्रुवारी रोजी ही योजना सुरू झाली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. राज्यातील सुमारे ७० लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये मदत मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा होणार असून केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या योजनेचा शुभारंभ पुणे येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात केला.
लागवडीलायक धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यँत असलेल्या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबियांना दोन हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. तलाठी यांच्या मदतीने लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार असून, ग्रामसेवक व कृषी सहायक याकामी सहकार्य करणार आहेत. योजना सुटसुटीत असून यासाठी आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक आवश्यक आहे. मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते प्रतिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील १४ लाभार्थी शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता.
शेतकऱ्यांच्या खात्यात
पैसे जमा होण्यास सुरु
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर येथील कार्यक्रमात योजनेचे उद्घाटन करताच जिल्ह्यातील शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास २ लाख ८२ हजार लाभार्थ्यांची माहिती योजनेच्या प्रणालीवर अपडेट करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. उर्वरित लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.