बारामती दि.२५ :- ‘ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ लाभापासून कोणताही लाभार्थी वंचीत रहाणार नाही, असे प्रतिपादन प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी आज येथे केले.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थी शेतक-यांना वार्षिक ६,०००/- रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत. यापैकी पहिल्या हप्त्याचे रक्कम रुपये २,०००/- च्या वाटपाचा शुभारंभ कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर, उत्तरप्रदेश येथे पार पडला. यानुषंगाने आज बारामती येथे या योजनेचा उद्धाटन समारंभ पार पडला.
बारामती तालुक्यामध्ये राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्था, कृषि विज्ञान केंद्र, बारामती, महाराष्ट्र शासनाच्या कृषि व महसुल विभागाच्या संयुक्त विद्यमाने माळेगाव येथील राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थेच्या सभागृहामध्ये शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसिलदार विजय पाटील, तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ,माळेगावचे केंद्रप्रमुख सय्यद शाकल अली सरगर, एनआयएएसएम चे विभागप्रमुख डॉ.जगदीश राणे, वरिष्ठ संशोधक डॉ.ब्राम्हणे, डॉ.गायकवाड तसेच तालुक्याच्या विविध भागातून आलेले लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.निकम यांनी सांगितले की, यावर्षी इंदापूर आणि बारामती तालुक्याला मिळालेल्या खरीप पिकांकरीताचे रुपये ६ कोटीचे अनुदान आवश्यक ती कार्यवाही करुन अल्प काळातच वितरीत करण्यात आले. त्याचप्रमाणे शासनाच्या दि.४ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयानंतर तालुक्यातील ११७ गावातील अल्प व अत्यल्प भूधारक पात्र लाभार्थीचा शोध घेण्यात आला. अल्प कालावधीमध्येच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त शेतक-यांपर्यत पोहचून त्यांची माहिती संकलित करण्यात आली. आतापर्यंत जवळपास २८,४८० लाभार्थ्यांचा डेटा अपलोड करण्यात आला आहे. लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रीया आताही सुरु असल्याचे सांगून. ज्यांची नावे अपलोड करण्यात आली आहेत, परंतु काही तांत्रीक बाबींमुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नसल्यास दुरुस्तीकरीता तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
या कार्यक्रमाकरीता नायब तहसिलदार संजय पांढरपट्टे, आर.सी.पाटील, कृषी व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि विज्ञान केंद्राचे विवेक भोईटे यांनी केले.