पुणे,दि.१५:-जागतिक सर्कस दिनानिमित्त जगभर सर्कस कलावंत प्राण्यांसह जल्लोष करत असताना भारतीय सर्कस मात्र प्रण्यांविना आता उतरणीला लागली आहे, याची खंत वाटते. सर्कसमध्ये प्राणी ठेवण्यास बंदी, मैदानांचे वाढते भाडे आणि महागाई यामुळे सर्कस चालविणे ही आता सर्कस बनली आहे. सर्कस कलेचा लोप होऊ नये यासाठी केंद्र व राज्यशासनाने प्रयत्न करायला हवे असे प्रतिपादन सर्कस मित्र मंडळ पुणेचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे यांनी आज केले. जागतिक सर्कस दिनानिमित्त मुंढवा येथील रॅम्बो सर्कसमध्ये ते बोलत होते.दरवर्षी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जागतिक सर्कस दिवस साजरा केला जातो. युरोपच्या फ्रान्सजवळील मोनॅको या छोट्या देशाची राजधानी मॉन्टे कार्लो येथे जागतिक सर्कस महोत्सवही आयोजित होत असतो. या पार्श्वभूमिवर पुण्यात मुंढवा येथील रॅम्बो सर्कसमध्ये भारतीय सर्कसचे प्रणेते कै. विष्णुपंत छत्रे यांच्या प्रतिमेस विदूषक, कलावंत व सर्कसप्रेमींनी पुष्पहार व फुले अर्पण करून जागतिक सर्कस दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तसेच यानिमित्त तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे ही उद्घाटन केले. यावेळी विष्णुपंत छत्रे यांच्या छायाचित्रासमोर वैष्णवी टिळेकर यांनी सुंदर पुष्परांगोळी काढली. विदुषकांच्या हस्ते उत्साहात केक कापण्यात आला. यावेळी तन्मयी मेहेंदळे यांनी प्रेक्षकांसमोर ‘मेरा नाम जोकर’ मधील “जीना यहा, मरना यहा…” हे गाणे सदर करून वाह वाह मिळविली.सर्कस मित्र मंडळ पुणेचे सरचिटणीस प्रवीण तरवडे यावेळी म्हणाले की, भारतीय सर्कसला १४० वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा आहे. आता अनेक कारणांमुळे देशातील सर्कस उद्योग ओहोटीला गेला आहे. त्यामुळेच प्रत्येक शहरात, गावात, मध्यवर्ती गावात सर्कसला परवडेल अशा दारात मैदाने उपलब्ध व्हावीत यासाठी, केंद्र व राज्य शासन तसेच महानगरपालिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या पुढील पिढ्यांना सर्कस प्रत्यक्ष बघता यावी यासाठी सर्कस जगलीच पाहिजे यासाठी शासन व नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे.सर्कस मित्र मंडळ पुणेचे सहसचिव अॅड. आनंद धोत्रे म्हणाले की, आपल्या देशात सर्कसला लोकाश्रय आहे यास आता राजाश्रयही मिळाला पाहिजे. करोना संकटात दोन वर्ष सर्कस बंद होत्या. सर्कस कर्जबाजरी झाले आहेत. त्यांना शासनाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. असे ते म्हणाले.यानंतर सर्कस मित्रमंडळ पुणेचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्यासमवेत सर्व कलावंत व प्रेक्षकांनी ‘सर्कस जिंदाबाद’, ‘सर्कस चिरायू होवो’, ‘लॉंग लिव्ह सर्कस सर्कस’ अशा घोषणा देऊन सर्कसचा तंबू दणाणून सोडला. सर्कसमध्ये आलेल्या लहान मुलांना विदुषकांच्या हस्ते स्वीट्स वाटण्यात आली. श्रुति तिवारी यांनी आभार प्रदर्शन केले.