पिंपरी चिंचवड,दि.१४:-जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एका ट्रकमधून लोखंडी सळई चोरणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले.
त्यांच्याकडून १८ लाख ७८ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.निजाम नवाब खान (वय ५८) शत्रुघ्न महाबल ठाकूर (वय ६०), इसराल अहमद आबेदअली (वय ३२ रा. तिघेही तळेगाव दाभाडे), महमंद आरिफ खान (वय ४०, रा. धारावी, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकातील अधिकारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबफाटा परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्या वेळी आरोपी चोरी करुन लोखंडी सळई घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख ७८ हजार रुपये किंमतीच्या सहा हजार ३१० किलो वजनाची चोरी केलेली लोखंडी सळईचे बंडल, चोरीचा माल घेवून जात असलेल्या १५ लाखांचा टेम्पो असा एकूण १८ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांच्याविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे तपास करत आहेत.