पुणे दि. 14 : राज्य शासनाच्या सचिवालय जिमखाना व केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन आणि लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय सव्हिल सेवा कल्चर आणि स्पार्टस बोर्ड नवी दिल्लीचे सचिव कुलभूषण मल्होत्रा यांच्या हस्ते आज झाले.यावेळी क्रीडा उपसचिव राजेंद्र पवार, सहसंचालक (क्रीडा) नरेंद्र सोपल उपस्थित होते. राज्य शासनाच्यावतीने सचिवालय जिमखाना, मुंबई यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. बॅडमिंटन स्पर्धेकरता दिल्लीहून अश्विनी कुमार तर लॉन टेनिस स्पर्धेकरीता नरेन्द्र कुमार हे निमंत्रक म्हणून उपस्थित आहेत.केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंडळातर्फे राज्य शासनांच्या सहयोगातून अखिल भारतीय लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत विविध राज्यांचे, विभागीय क्रीडा मंडळांचे तसेच केंद्र शासित प्रदेशांचे संघ सहभागी होतात. यंदा या स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राकडे असून 14-20 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडत आहे.संपूर्ण भारतातून बॅडमिंटन स्पर्धेकरिता 40 संघ सहभागी झालेले आहेत. तर लॉन टेनिस स्पर्धेकरीता 26 संघ सहभागी झाले आहेत. या दोन्ही स्पर्धेत सुमारे एक हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. वैयक्तिक तसेच सांघिक स्वरूपात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत राज्यांच्या सेवेतील अधिकारी व कर्मचारी तसेच केंद्र शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत. बॅडमिंटन स्पर्धेचे सचिव सुहास चव्हाण असून टेनिस स्पर्धेचे सचिव अनिरुद्ध देशपांडे आहेत.