पुणे,दि.२७ : – राज्य आणि राष्ट्रीय रोलबॉल खेळाडूना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून यासाठीच्या योग्य त्या सुचना प्रशासनाला दिल्या असल्याचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
जिल्हा रोलबॉल मैदानावर भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने, महाराष्ट्र रोलबॉल संघटना व जिल्हा रोलबॉल संघटना यांच्यावतीने एक भारत श्रेष्ठ भारत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचे नोडल अधिकारी लेफ्ट. कर्नल अमरबीर सिंग, काकडे बिल्डर्सचे सुर्यकांत काकडे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर, लहू बालवडकर, राज्य रोलबॉलचे उपाध्यक्ष अमोल काजळेपाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सध्याच्या घडीला रोलबॉल हा खेळ शासकीय खेळाच्या यादीमध्ये आला असला तरी देखील या खेळाडूना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळालेले नाही. यामुळे अनेक दर्जेदार खेळाडू असून देखील या खेळाडूना इतर खेळाच्या खेलाडूप्रमाणे सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळालेले नाही. मात्र, पालकमंत्री चंद्राकांतदादा पाटील यांनी या खेळातील खेळाडूना नोकरीमध्ये सरकारी आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगून योग्य त्या सुचना प्रशासनाला दिल्या असल्याचे यावेळी सांगितले.
सध्याच्या घडीला हे मैदान खुल्या स्वरूपात आहे. मैदानाला छत बांधण्यासाठी तसेच फ्लड लाईट्स बसविण्यासाठी निधीची मागणी महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्यावतीने करण्यात आली होती. या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना मैदनाला छत बांधणी, फ्लड लाईट्स बसविण्यासाठीच्या सुचना स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांना दिल्या. याबरोबरीने मैदानावर कायमस्वरूपी खुर्च्या देखील देण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले. यामुळे मैदानाचे रूप पालटून याला रोलबॉल अंतरराष्ट्रीय मैदानामध्ये रुपांतरीत होवू शकेल.
एक भारत श्रेष्ठ भारत या स्पर्धेचे उद्घाटन आज करण्यात आले. ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात येणार असून स्पर्धा पहिल्या टप्प्यातील लढती जिल्हा रोलबॉल मैदनावर घेण्यात येणार आहेत. ही स्पर्धा मुले व मुली अशा दोन्ही विभागात होणार असून हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश,मणिपूर, नागालँड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र व ओडिसा हे संघ सहभागी होणार आहेत. उद्यापासून सर्व संघाच्या लढती सुरु होणार आहेत.